---Advertisement---

आयएसएल २०१९- कोरोमिनस आणि माझ्यात निकोप स्पर्धा- मानवीर

On: मंगळवार, नोव्हेंबर 5, 2019 11:07 AM
---Advertisement---

गोवा । हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी गुवाहाटीतील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर एफसी गोवाला नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध बरोबरी साधून देणारा नाट्यमय गोल बदली खेळाडू मानवीर सिंग याने केला. बेंचवरून मैदानावर उतरल्यानंतर त्याने आव्हानात्मक परिस्थितीचा यशस्वी सामना केला.

आयएसएलमध्ये मानवीर गोव्याकडून तीन मोमस खेळला असून त्याचा हा दुसराच गोल आहे. यात मानवीरला काहीच दोष देता येणार नाही, कारण बहुतांश वेळा बदली खेळाडू म्हणूनच तो खेळला आहे. गेल्या मोसमात तो बदली खेळाडू म्हणून 19 वेळा मैदानावर उतरला, पण या मोसमात त्याच्यासाठी चित्र पालटले असावे असे वाटते.

पहिल्या दोन सामन्यांत चेन्नईयीन एफसी आणि बेंगळुरू एफसी यांच्याविरुद्ध त्याला स्टार्ट मिळाली. त्याने चांगली कामगिरी केली असावी. तिसऱ्या सामन्यात त्याला बेंचवर बसविण्यात आले तरी बदली खेळाडू म्हणून संधी मिळताच त्याने ठसा उमटविला. अखेरच्या क्षणी त्याने केलेल्या गोलमुळे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा आनंदीत झाले.

मानवीर म्हणाला की, जेव्हा संधी मिळते तेव्हा मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करतो. गेल्या मोसमात मी एक गोल सुद्धा केला आणि एका गोलमध्ये योगदान दिले. यंदा दोन सामन्यांत मला स्टार्ट मिळाली आणि दोन्ही वेळा चांगले झाले. तिसऱ्या सामन्यात नॉर्थईस्टविरुद्ध मी बेंचवर होतो. मग संधी मिळताच मी संघाला बरोबरी साधून देणारा गोल केला. या कामगिरीचा मला फार आनंद होतो आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळावी म्हणून मी वाट बघत होतो.

सेंटर फॉरवर्ड म्हणून मानवीरच्या खेळाचा दर्जा उंचावला आहे हे आता प्रकर्षाने जाणवते आहे. फेरॅन कोरोमीनास याच्यासारखा नैसर्गिक गोलमशीन असलेला स्ट्रायकर ज्या संघात आहे, तेथे राहण्याचे फायदे मानवीरला मिळत आहेत.

मानवीरने सांगितले की, कोरोमीनास याच्यासारख्या दिग्गज खेळाडूच्या बरोबरीने खेळणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. गेल्या दोन मोसमांत त्याने सर्वाधिक गोल केले आहेत. त्याची निर्णयप्रक्रिया फार चांगली आहे आणि त्याचे चेंडूवरील कौशल्य अप्रतिम आहे. कोरोमीनास आणि माझ्यात कडवी स्पर्धा आहे. सराव सत्रात मी सर्वोत्तम प्रयत्न करतो. बाकी सगळे मग प्रशिक्षकांवर अवलंबून असते.

मानवीर पुढे म्हणाला की, क्लबच्या वाटचालीत सर्जिओ लॉबेरा यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे ट्रेनिंग प्रत्येक भारतीय खेळाडूसाठी फार चांगले ठरले आहे. त्यांच्यामुळे चेंडूवरील कौशल्य विकसित करण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो. त्यांच्या तांत्रिक ज्ञानामुळे कौशल्य आणि क्षमता उंचावण्यास मदत होतो.

संधी चालून येते तेव्हा मानवीर पुरेपूर फायदा उठवितो. यंदा मोसमाला झालेला प्रारंभ त्याच्यासाठी आनंददायक ठरला आहे. कोरोमीनास याने आधीच्या सामन्यात जे केले होते ते नॉर्थईस्टविरुद्ध मानवीरने केले. तेव्हा स्पेनच्या कोरोमीनासने पेनल्टीवर लक्ष्य साधले होते. त्यामुळे गोव्याला बेंगळुरूविरुद्ध बरोबरी साधता आली होती.

मानवीरने सांगितले की, बेंगळुरूविरुद्ध सुद्धा आम्ही एका गोलने मागे होतो. अखेरच्या क्षणी गोल करण्याची आणि शेवटपर्यंत झुंज देण्याची सवयच आम्हाला जडली आहे. फुटबॉलमध्ये कोणत्याही क्षणी गोल होऊ शकतो. आम्ही कदापी हार मानत नाही आणि त्यामुळेच आम्हाला असे निकाल साध्य करता येतात.

पंजाबचा तरुण मानवीर गेले तीन मोसम गोव्यात खेळतो आहे. गोवेकर फुटबॉलप्रेमींच्या साक्षीने खेळताना त्याला विलक्षण समाधान लाभते. तो म्हणाला की, मी पंजाबचा आहे, पण गोव्यासाठी खेळताना मला फार आनंद मिळतो. निकाल काहीही लागला तरी प्रेक्षक संघाला पाठिंबा देतात. गोव्यातील प्रेक्षक जाणकार आहेत. ते आम्हाला खूप प्रेरणा देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---