जगातील सर्वात मोठी व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मे महिन्यात आयपीएल अर्ध्यातून स्थगित करण्यात आलेली. त्यानंतर आता चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर परदेशात दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला जाईल.
आयपीएलच्या या उत्तरार्धात अनेक नवे विक्रम रचले जाण्याची शक्यता आहे. या ३१ सामन्यांच्या टप्प्यामध्ये काही दिग्गजांना नवे विक्रम रचण्याची संधी असेल. त्यापैकी पाच विक्रमांवर आपण नजर टाकूया.
१) मिश्रा रचू शकतो इतिहास
भारतीय संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू अमित मिश्रा हा आयपीएलच्या उत्तरार्धात सर्वात मोठा विक्रम आपल्या नावे करू शकतो. केवळ पाच बळी मिळवून तो लसिथ मलिंगाला मागे टाकत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. मलिंगा निवृत्त झाल्याने त्याचा हा विक्रम मोडण्याची आयती संधी मिश्राकडे असेल. दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत असलेल्या मिश्राच्या नावावर सध्या १६६ आयपीएल बळी असून पाच बळी मिळवताच तो या यादीत अव्वलस्थानी जाईल.
२) अश्विन-भुवी गाठू शकतात जादुई आकडा
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व अव्वल वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्याकडे आयपीएल इतिहासात १५० बळी पूर्ण करण्याची संधी असेल. या दोघांच्या नावे सध्या प्रत्येकी १३९ बळी जमा आहेत. आयपीएलमध्ये केवळ पाच गोलंदाजांना १५० बळी पूर्ण करता आले आहेत. यामध्ये लसिथ मलिंगा, अमित मिश्रा, पियुष चावला, ड्वेन ब्रावो व हरभजन सिंग यांचा समावेश आहे.
३) दोन अष्टपैलूंची नजर शंभर बळींवर
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू असलेला दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस व भारताचा अक्षर पटेल यांना या आयपीएल उत्तरार्धात १०० बळी पूर्ण करण्याची संधी आहे. मॉरिसला हा टप्पा पार करण्यासाठी केवळ सहा तर, अक्षरला १४ बळी हवे आहेत. दोघेही अनुक्रमे राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतील.
४) पोलार्ड साजरे करणार अनोखे शतक
मुंबई इंडियन्स संघाचा उपकर्णधार व अष्टपैलू कायरन पोलार्ड याच्याकडे या आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. सध्या त्याच्या नावे ९२ बळी आहेत. आयपीएल इतिहासात केवळ एका क्षेत्ररक्षकाने १०० पेक्षा जास्त झेल घेण्याची कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना याने आयपीएलमध्ये १०४ झेल टिपले आहेत.
६) हर्षलची नजर ब्रावोच्या विक्रमावर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षल पटेल हा सध्या ७ सामन्यात १७ बळी घेऊन पर्पल कॅपचा दावेदार बनला आहे. आयपीएलच्या उत्तरार्धात त्याच्याकडे ड्वेन ब्रावोचा विक्रम मोडण्याची संधी असेल. ब्रावोने २०१३ आयपीएलमध्ये १८ सामन्यात ३२ गडी बाद केलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
यंदा विराटसाठी ‘आर या पार’ स्थिती! फेल झाल्यास आरसीबीच्या कर्णधारपदावरुन होऊ शकते हाकालपट्टी
अरेरे! न्यूझीलंडनंतर आणखी एक देश पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या तयारीत
रोहित टी२०चा कर्णधार बनल्यास उपकर्णधारासाठी निवडकर्त्यांची माथापच्ची, ‘ही’ नावे शर्यतीत आघाडीवर