शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) रायपूरमध्ये खेळला गेलेला चौथा टी20 सामना भारतीय संघासाठी अनेक अर्थांनी खास ठरला. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 136 विजय मिळवणारा संघ बनला. तसेच, दुसरीकडे भारताचा मराठमोळा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड यानेही खास विक्रम केला. विशेष म्हणजे, ऋतुराजने सर्व भारतीय खेळाडूंचा टी20तील विक्रम मोडीत काढला आहे.
ऋतुराजचा विक्रम
सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 4000 धावा (Ruturaj Gaikwad Fastest 4000 Runs) पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या टी20त त्याने 28 चेंडूत 32 धावांची छोटेखानी खेळी केली. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचाही समावेश होता. ऋतुराजने 7 धावा करताच टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या.
ऋतुराजने या विक्रमात भारतीय स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा विक्रम मोडीत काढला. राहुलच्या नावावर यापूर्वी टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान 4000 धावा बनवण्याचा विक्रम होता. त्याने ही कामगिरी करण्यासाठी 117 डावांचा आधार घेतला होता. तसेच, विराटनेही ही कामगिरी करण्यासाठी 138 डाव खेळले होते. मात्र, ऋतुराजने 116 डावांमध्ये ही कमाल करत विक्रम आपल्या नावे केला.
भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 4000 धावा पूर्ण करणारे फलंदाज
116 डाव- ऋतुराज गायकवाड*
117 डाव- केएल राहुल
138 डाव- विराट कोहली
143 डाव- सुरेश रैना
सामन्याचा आढावा
नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांच्या वादळी खेळीच्या जोरावर 9 विकेट्स गमावत 174 धावा केल्या. यावेळी रिंकूने 29 चेंडूत 46 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. तसेच, जितेश शर्मा यानेही 19 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या.
भारताच्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावाच केल्या. यावेळी त्यांच्याकडून सलामी फलंदाज ट्रेविस हेड (31) आणि कर्णधार मॅथ्यू वेड (नाबाद 36) यांना सोडून इतर कोणताही फलंदाज 30 धावांचा आकडा पार करू शकला नाही. भारतासाठी अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या फायदेशीर गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अक्षरने 4 षटकात 16 धावा खर्चून 3 विकेट्स नावावर केल्या. यासह भारताने मालिकेत 3-1ने विजयी आघाडी घेतली. (marathi cricketer ruturaj gaikwad becomes the fastest indian to complete 4000 runs in t20 broke kl rahul virat kohli record)
हेही वाचा-
टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा अतिशय महत्त्वाचा Record, आता…
ऑस्ट्रेलियाला धूळ चारताच कॅप्टन सूर्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला त्याला दबावात टाकायला आवडते…’