ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शील्ड ही देशांतर्गत स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नुकताच 30 वर्षांपूर्वीचा मार्क आणि स्टिव्ह या वॉ बंधूचा विक्रम तुटला आहे. हा विक्रम मार्कस हॅरिस आणि विल पुकोवस्की यांनी विक्टोरिया संघाकडून खेळताना मोडला आहे.
या दोघांनी साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पहिल्या डावात पहिल्या विकेटसाठी तब्बल 486 धावांची भागीदारी रचली आहे. त्यामुळे शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील ही कोणत्याही विकेटसाठी रचलेली सर्वोच्च धावांची भागीदारी आहे. हा विक्रम हॅरिस आणि पुकोवस्कीने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केला.
याआधी हा विक्रम वॉ बंधूंच्या नावावर होता. त्यांनी 30 वर्षांपूर्वी 1990 ला न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध 464 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचली होती. तसेच त्याआधी डेव्हिड हूक्स आणि वायन फिलिप्स या जोडीने साऊथ ऑस्ट्रेलियाकडून 1987 ला चौथ्या विकेटसाठी 462 धावांची भागीदारी रचली होती.
सर्वोच्च सलामी भागीदारी –
हॅरिस आणि विल पुकोवस्की यांनी 486 धावांची भागीदारी ही शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील सर्वोच्च धावांची सलामी भागीदारीही ठरली आहे. याआधी हा विक्रम बिल वूडफुल आणि बिल पॉन्सफोर्ड यांनी 375 धावांची सन 1926 ला सलामी भागीदारी रचली होती. म्हणजेच तब्बल 94 वर्षांनी हॅरिस आणि पुकोवस्कीने हा विक्रम मोडला आहे.
हॅरिस आणि पुकोवस्की यांनी केली द्विशतके –
या सामन्यात हॅरिस आणि पुकोवस्की यांनी वैयक्तिक द्विशतके केली आहेत. हॅरिसने 399 चेंडूत 239 धावा केल्या आहेत. तर पुकोवस्कीने 386 चेंडूत नाबाद 255 धावा केल्या आहेत. या दोघांच्या या खेळीच्या जोरावर विक्टोरियाने पहिला डाव 3 बाद 564 धावावंर घोषित केला आहे. त्याआधी साऊथ ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 200 धावा केल्या होत्या. त्यामुळे विक्टोरियाने 364 धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी –
क्रिकेट इतिहासात सर्वात मोठी भागीदारी श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2006 मध्ये तिसऱ्या विकेटसाठी 624 धावांची भागीदारी रचली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! इरफान करतोय कमबॅक, २२ नोव्हेंबर रोजी खेळणार पहिला सामना
रोहित शर्मा कधी करणार पुनरागमन? पाहा पोलार्ड काय म्हणतोय
आता कोण रोखणार.. ! एक खास योगायोग पुन्हा जुळून आला तर मुंबईचे विजेतेपद पक्के