पाकिस्तानचे पंच अलीम दार यांनी पंच कारकिर्दीत एक मोठा विक्रम रचneआहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांत ‘पंच’ म्हणून पंचगिरी करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
अलीम दार हे मूळचे पाकिस्तानचे आहेत. गेली 20 वर्षे ते आंतरराष्ट्रीय सामन्यात जगभरात पंच म्हणून पंचगिरी करत आहे. आता सर्वाधिक सामन्यांत पंच म्हणून उभे राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध झिंम्बाब्वे सामन्यात ते मुख्य पंच होते. पंच कारकिर्दीतला हा त्यांचा 210 वा सामना होता. या सामन्यानंतर त्यांनी 209 सामन्यांत पंचगिरी केलेल्या रूडी कर्ट्जन यांना मागे टाकले आहे.
2000 साली सुरू केली होती कारकीर्द
अलीम दार यांनी आपल्या पंच कारकिर्दीची सुरुवात 2000 साली केली होती. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या एकदिवसीय सामन्यातुन अलीम दार पंच म्हणून पहिल्यांदा उभे राहिले होते. 2002 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने त्यांचे नाव ‘इंटरनेशनल पॅनल ऑफ अंपायर’ या यादीत समाविष्ट करून घेतले. 2003 साली प्रथमच कसोटी सामन्यांत पाच दिवस पंच म्हणून उभे राहण्याची पहिली संधी त्यांना मिळाली. चांगल्या कामगिरीमुळे त्यांना 2009,2010 व 2011 अशी सलग तीन वर्षे आयसीसीने त्यांना ‘सर्वोत्कृष्ट पंच’ म्हणून पुरस्कार दिला.
अलीम दार सर्वाधिक सामन्यांत निर्णय देणारे पंच
अलीम दार सध्या 52 वर्षाचे आहेत. मागील वर्षी त्यांनी सर्वाधिक कसोटी सामन्यांत पंच बनण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. हा विक्रम करताना त्यांनी स्टीव्ह बकनर यांना मागे टाकले होते. अलीम दार यांच्या नावावर 132 कसोटी सामने आहेत. एकदिवसीय सामन्यांत ही सर्वाधिक 210 सामने अलीम दार यांच्या नावावरआहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये ते अहसान रजानंतर दुसऱ्या स्थानी असून त्यांच्या नावावर 46 सामने आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील आकडेवारी एकत्र केल्यास अलीम दार यांच्या नावावर एकूण 388 सामन्यांत पंचगिरी करण्याचा विक्रम आहे.
आयसीसी व पीसीबीचे मानले आभार
वनडे सामन्यांत सर्वाधिक सामन्यांत पंच राहिलेल्या अलीम दार यांनी आयसीसी व पीसीबीचे आभार मानले आहेत. हा विक्रम नावावर होण्यासाठी त्यांनी दिलेल्या संधीबद्दल त्यांनी हे आभार मानले आहेत. कारकीर्द सुरू होण्यापूर्वी इथं पर्यंत पोहोचू शकेल याचीही खात्री मला नव्हती असे अलीम दार म्हणाले.






