दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सेंच्युरियनमधील ‘सुपरस्पोर्ट पार्क’वर खेळला गेला. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा एका डावाने आणि 219 धावांनी पराभव केला. हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.
या निकालामुळे 2025-27च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. बांगलादेशला मोठा धक्का बसला असून ते पहिल्या पाच संघांतून बाहेर फेकले गेले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थानावरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
दक्षिण आफ्रिका 77.78% गुणांसह WTC क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया 69.23% गुणांसह दुसऱ्या, तर न्यूझीलंड 66.67% गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ 50% गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, बांगलादेश सहाव्या स्थानावर घसरला असून, इंग्लंड 38.54% गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशच्या खात्यात सध्या 36.67% गुण आहेत.
भारतीय संघाकडे अजूनही 2025-27 च्या WTC चक्राच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत विजय मिळवणे आवश्यक असेल.
भारत सध्या 50% गुणांसह- चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील आगामी ख्राइस्टचर्च कसोटी भारतीय संघासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. या सामन्यात विजय मिळाल्यास, भारतीय संघाला गुणतालिकेत आपली स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्या (27 नोव्हेंबर ) पासून खेळला जाणार आहे.






