काल(२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएलच्या १३ व्या हंगामातील दुसर्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या होत्या. दुबईतील या सामन्यात दिल्लीचा अर्धा संघ ८७ धावांत माघारी परतला होता. त्यामुळे पंजाबला मोठं आव्हान मिळणार नाही असे वाटत होते, पण मार्कस स्टॉयनिसने शेवटच्या काही षटकात तुफानी फटकेबाजी करत केवळ अर्धशतकच ठोकले नाही तर दिल्लीला १५० धावा ओलांडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
स्टॉयनिसने या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक केले आहे. त्याने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला, परंतु नंतर तो नो बॉल देण्यात आला. तरीही त्याला माघारी जावे लागले. स्टॉयनिसने २१ चेंडूं खेळत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या.
दिल्ली संघासाठी हे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. स्टॉयनिसने धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे, सेहवागने २०१२ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध असेच २० चेंडूत अर्धशतक केले होते. तर त्याचबरोबर दिल्लीकडून २०१६ मध्ये १७ चेंडूत ख्रिस मॉरिस आणि २०१९ मध्ये रिषभ पंतने १८ चेंडूत अर्धशतक झळकावल होतं.
स्टॉयनिसने या हंगामातील तिसरं अर्धशतक झळकावले. त्याच्या अगोदर या हंगामात सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फाफ डू प्लेसिस आणि अंबाती रायडू यांनी मुंबई इंडियन्सविरूद्ध अर्धशतक ठोकली आहेत.
दिल्लीसाठी कालच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने ३२ चेंडूत ३ षटकासह ३९ धावा तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने २९ चेंडूच्या खेळीत ४ चौकारांच्या मदतीने ३१ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ३, शेल्डन कॉट्रेलने २ आणि युवा रवी बिश्नोईने १ विकेट्स घेतली.
पण नंतर पंजाबनेही निर्धारित २० षटकात ८ बाद १५७ धावा केल्याने सामन्यात बरोबरी झाली. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने दिल्लीला ३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने ४ धावा करत सहज पार केले.