गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत सामना जिंकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांवर गुंडाळल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आक्रमक फटकेबाजी करत संघाला उत्कृष्ट सुरुवात दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ याने त्याचे कौतुक केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ चांगलाच अडचणीत सापडला. सुरुवातीला वेगवान गोलंदाज व त्यानंतर रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 177 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा याने वेगवान सुरुवात दिली. रोहितने पहिल्याच षटकात तीन सणसणीत चौकार ठोकले. त्याने आपले आक्रमण कायम ठेवत 66 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 बाद 77 अशी मजल मारलेली. रोहित 69 चेंडूवर 9. चौकार व एका षटकाराच्या मदतीने 56 धावांवर नाबाद आहे.
रोहितच्या याच आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ हा देखील प्रभावित झाला. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना तो म्हणाला,
“रोहित शर्माबाबतची सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे तो गोलंदाजांवर दबाव टाकतो. तो अगदी काही षटकांमध्ये विरोधी संघाच्या हातून सामना घेऊन जातो.”
रोहित शर्मा प्रथमच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये नेतृत्व करताना दिसत आहे. कर्णधार तसेच प्रमुख फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी त्याच्यावर असेल. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वैयक्तिक शतक झळकावून भारतीय संघाला, मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न तो करेल.
(Mark Waugh Praised Rohit Sharma Batting Approch)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, ‘मीच कोच आणि कॅप्टनला म्हणालेलो मला टीममधून ड्रॉप करा’
आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूचे झाले नव्हते ‘असे’ पदार्पण, सूर्याने कसोटी कॅप मिळताच रचला विक्रम






