इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा मिनी लिलाव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आयपीएल प्रेमींसह लिलावात सहभागी खेळाडू देखील मोठ्या उत्सुकतेने आपली कोणत्या संघात किती किंमतीला बोली लागेल, याची वाट पाहत आहेत. अशात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याने लिलावात सहभागी होण्याआधीच माघार घेतली आहे. आज (१८ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता चेन्नईमध्ये हा लिलाव पार पडणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, या ३१ वर्षीय खेळाडूने बुधवारी (१७ फेब्रुवारी) आयपीएल व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती दिली आहे. नुकताच मार्क हा वडील बनला असून आपल्या कुंटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे भारताविरुद्ध चालू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र अखेरच्या २ सामन्यांत तो खेळताना दिसेल.
तब्बल २ कोटींची आधारभूत किंमत
महत्त्वाचे म्हणजे, मार्क आयपीएल लिलावाची सर्वाधिक आधारभूत किंमत म्हणजे २ कोटींसह लिलावात उतरणार होता. लिलाव यादीतील वेगवान गोलंदाजांच्या चौथ्या सेटमधील खेळाडूंमध्ये २४ व्या स्थानावर त्याचे नाव होते. गतवर्षी मुंबई इंडियन्स संघाने दिग्गज वेगवान लसिथ मलिंगाच्या जागी त्याला आपल्या ताफ्यात सहभागी होण्याची ऑफर दिली होती. परंतु मार्कने नकार दिल्यामुळे मुंबईने जेम्स पॅटिसनची निवड केली होती.
अशात यंदा लिलावात सहभागी झाल्यास रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघासह इतर संघांमध्ये मार्कसाठी रस्सीखेच होताना दिसली असती. परंतु वैयक्तिक कारणामुळे मार्कने माघार घेतल्याने सध्या इंग्लंडचे केवळ १६ खेळाडू मिनी लिलावात सहभागी होतील. मार्कपुर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रुटनेही आयपीएल २०२१ लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे.
मार्क वुडला आयपीएलचा फार कमी अनुभव
मार्क वुडच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, आजवर त्याने फक्त १ सामना खेळला आहे. २०१८ साली चेन्नई सुपर किंग्सने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. परंतु पूर्ण हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने एकमेव सामना खेळला. या सामन्यातही त्याला विशेष कामगिरी करता आली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
आयपीएलच्या सर्व फ्रँयाचझींची यादी, पाहा कोणता खेळाडू आहे कोणत्या संघात
आयपीएल फ्रँचायझींना मोठा फटका, ‘हे’ खेळाडू पहिल्या २ आठवड्यांसाठी असणार संघाबाहेर