भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकमेकांचा सामना करणार आहेत. मालिकेतील पहिल्या नागपूर कसोटीला (Nagpur Test) सुरुवात होण्यापूर्वीच या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून सातत्याने शाब्दिक दावे केले जात आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज मार्नस लॅब्युशेन याने अश्विनविरुद्ध फलंदाजी करणे म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासारखे असल्याचे म्हटले आहे.
नागपूर कसोटीद्वारे लॅब्युशेन प्रथमच भारतात कसोटी क्रिकेट खेळताना दिसेल. सध्या जागतिक कसोटी फलंदाजी क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या मालिकेत त्याच्याकडून ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या अपेक्षा असतील. ऑस्ट्रेलियन संघासमोर या मालिकेत रविचंद्रन अश्विनचा मोठा अडथळा असेल. अश्विन फिरकीला मदतगार असणाऱ्या भारतीय खेळपट्ट्यांवर अतिशय आक्रमक गोलंदाजी करताना दिसतो. त्याच मुद्द्यावर बोलताना लॅब्युशेन म्हणाला,
“अश्विन एक महान गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे निश्चितच मोठे अवघड काम असते. मी तर म्हणेल की त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे बुद्धिबळ खेळण्यापेक्षा कमी नव्हे.”
अश्विन हा भारतात विरोधी संघांसाठी नेहमीच एक कर्दनकाळ ठरतो. त्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 88 कसोटी सामने खेळताना 400 पेक्षा जास्त बळी टिपलेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ देखील सध्या त्याला घाबरलेला दिसत आहे. कारण, अश्विनसारखी गोलंदाजी करणाऱ्या महेश पिठीया या युवा गोलंदाजाला त्यांनी आपल्या नेटमध्ये आमंत्रित केले होते.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक-
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे पार पडले. त्यानंतर दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान पार पडेल. याव्यतिरिक्त तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघ धरमशाला येथे 1 ते 5 मार्चदरम्यान भिडतील. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे 9 ते 13 मार्चदरम्यान पार पडेल.
(Marnus Labuschagne Said Playing Against Ashwin Is More Like Chess)