भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (१७ नोव्हेंबर) टी२० मालिकेतील पहिला सामना रंगला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावत १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ५ गड्यांच्या नुकसानावर १९.४ षटकात हा सामना जिंकला. या सर्व भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने एक नवा विक्रम आपल्या नावे जमा केला.
गप्टिल-चॅपमनने सावरला न्यूझीलंडचा डाव
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर नियमित कर्णधार केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड संघ या मालिकेत उतरला आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ७० धावा केल्या. सलामीला फलंदाजीला येत त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना संघासाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ३ चौकार ठोकले. गप्टिलव्यतिरिक्त चॅपमननेही अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवले. त्याने ५० चेंडूंमध्ये २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६३ धावा चोपल्या.
गप्टिलच्या नावावर नवे विक्रम
आपल्या ७० धावांच्या शानदार खेळीमध्ये मार्टिन गप्टिलने काही विक्रमांना गवसणी घातली. तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक अर्धशतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला. त्याच्या नावावर २१ अर्धशतके जमा आहेत. या यादीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा प्रथम क्रमांकावर असून त्याने २३ अर्धशतके झळकावली आहेत. यासह तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३० पेक्षा जास्त भावा सर्वाधिक वेळा बनवणारा फलंदाज आहे. अशी कामगिरी त्याने तब्बल ४८ वेळा केली असून, तो न्यूझीलंडसाठी ९ वेगवेगळ्या देशांविरुद्ध अर्धशतक करणारा एकमेव फलंदाज आहे.