ट्रिंग ट्रिंग!
“हॅलो?”
“विज्या, सचिन ९२वर खेळतोय. मी सुम्याला सांगितलंय, तू वैभ्या आणि मोहनला सांग.”
खाड्! दाम्याने फोन आपटला. काही क्षणात ४ही घरांत टीव्ही लागला होता.
–
“सचिन ९२वर खेळतोय रे…!!”
पणशीकर चाळीत आरोळी घुमली.
चाळीतल्या एकमेव टीव्हीच्या मालकांना दार उघडण्याचीही तसदी घ्यावी लागली नाही. १७ माकडं काही कळायच्या आत खिडकीतून उड्या मारून टीव्हीसमोरच्या चटईवर मांडी घालून बसली होती. टीव्हीवाल्या तावरे काकांनी प्रत्येकाला एकेक चिक्की दिली, आणि स्वतः कोपऱ्यातल्या खुर्चीत जाऊन बसले.
खोलीतल्या १८ जीवांना आता एकाच गोष्टीची आस लागली होती.
–
शोरूम समोरची गर्दी वाढतच चालली होती.
तेवढ्यात एक माणूस तिकडे आला. त्याने आवाज दिला, “स्कोअर काय झाला रे?”
“सचिन ९२ वर पोहोचला” गर्दीतून ४-५ आवाज आले.
त्या माणसाचे पाय थबकले. भारताचा स्कोअर विचारण्याचं भान ना त्या माणसाला होतं, ना ते उत्तर देणाऱ्या गर्दीला.
सगळ्यांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागलं होतं.
–
“अहो ट्रेन का थांबलीये?”
“स्टेशन आलं काकू…”
“अहो पण इतका वेळ? छोटंच स्टेशन आहे ना?”
“हो, पण सचिन ९२ वर खेळतोय ना…”
“अग्गोबाई! हो का? तरीच आमचे ‘हे’ गेले उतरून पटकन!”
“चला काकू तुम्हीपण मॅच बघायला!”
–
“फोर फोर फोर फोर फोर…. स्स्सस्स्स. गेली असती.”
“दाम्या, उगाच आरडा-ओरडा करू नकोस. २ रन काढलेत ना त्याने?” दादा गुरकावला.
“४ काढले असते! आणि तू रे दादा, तुला सांगितलं ना सोफ्यावर डावा पायवर घेऊन बसू नको म्हणून. सचिन लवकर आऊट होतो अशाने. खाली घे आधी तो.”
“गप रे! असं काही नसतं.”
“दादा, मारीन हं! ९४ वर खेळतोय म्हणून सांगतोय. नाहीतर असं कधी सांगतो का मी तुला?”
“तू ढीग सांगशील.. मी ऐकणारे का तुझं? आत्ता शेवटचं हां. ते पण ९४ वर आहे म्हणून.”
–
“येsss दोन रन. दोन रन. दोन रन.”
पोरांना फार वेळ चटईवर बसवेना. उत्साहाच्या भरात सगळी पोरं उठून उभी राहीली. तावरेकाकांनी गडबडीने सगळ्यांना खाली बसवलं. सगळी परत मॅच बघू लागली.
तेवढ्यात सचिनने १ रन काढली.
“९५…” पोरं ओरडली.
आता उरल्यासुरल्या चाळीलाही सचिनची सेंच्युरी व्हायला आलीये हे कळलं होतं. तावरेकाकांच्या खिडकीबाहेर सगळे जमले. नुकतेच कामावरून परतलेले घरातले कर्ते पुरुष हात-पाय न धुता तसेच धावले. बायकांनीही ‘बघू तरी काय चाललंय’ अशा विचाराने गर्दी करायला सुरुवात केली.
–
रस्त्यावरच्या लोकांनी थांबून मॅच बघायला सुरुवात केली होती. टी.व्ही. शोरुमसमोरचा रस्ता माणसांनी व वाहनांनी गच्च भरला होता. एकेका रनसाठी जोरदार जल्लोष होत होता.
घरी टी.व्ही. नसलेले, ऑफिसमधून घरी जाणारे, घरी सोय असूनही वातावरण अनुभवायला बाहेर आलेले असे असंख्य लोकं तिकडे जमले होते. एरवी एकमेकांना कधी पाहीलंही नसतं असे लोक शेजारी उभे राहून टाचा उंचावत मॅच बघत होते.
“फोर!!” एकच जल्लोष झाला. सचिन ९९ वर पोहोचला होता. कोणत्याही परिस्थितीत त्या रस्त्यावरून कोणीही हलायला तयार नव्हता.
–
रेल्वे स्टेशनची परिस्थिती याहून काहीच वेगळी नव्हती. स्टेशनवरच्या एकमेव टि.व्ही.समोर दोन-अडिचशे माणसांनी गर्दी केली होती. त्यांच्यातल्या किती लोकांना स्कोअर दिसत होता देवच जाणे, पण कित्त्येकांना स्कोअर बघायचीही गरज नव्हती. ‘मघाशी ९२ वर होता, मग दोन रन काढले, म्हणजे ९४, त्यानंतर एक सिंगल आणि एक फोर. म्हणजे ९९.’ हा हिशेब कधीचा त्यांच्या डोक्यात चालू होता.
त्या इवल्याशा स्टेशनला स्टेडियमचं स्वरूप आलं होतं.
–
आणि स्टेडियम?
विचारायलाच नको! प्रत्येकाच्या हृदयाची धडधड शिगेला पोहोचली होती. प्रत्येक जण डोळ्यात प्राण आणून एकाच व्यक्तीकडे लक्ष लावून बसला होता. प्रत्येक जण स्वत:ला त्यात बघत होता. आपल्या अपमानाचा, आपल्या दु:खाचा, आपल्या पराभवाचा बदला घ्यायलाच जणू देवाने त्याला पाठवले होते.
आता फक्त १ रन!
सचिन स्ट्राईकवर आला.
“हाऊज् दॅट!!!!” LBWचे जोरदार अपील झाले. करोडो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्टेडियममध्ये एकाएकी मरणशांतता पसरली.
अंपायरनेही अंत पाहीला. शेवटी नॉट-आऊट दिले गेले. आख्ख्या स्टेडियमने रोखून धरलेला श्वास सोडला.
पुढचा बॉल! बॉलर बॉल टाकायला धावू लागला. सर्वांनी मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. सर्वांच्या नजरा एकाच ठिकाणी खिळल्या. अवघे स्टेडियम स्तब्ध झाले.
“Four runs!! Beautiful shot to reach the milestone. Sachin Tendulkar completes his century with a spectacular boundary.” कॉमेंट्रेटर चित्कारला. आख्ख्या देशात आनंदाला उधाण आले.
दाम्याने सगळ्या मित्रांना फोन करुन आनंद शेअर केला. दादाच्या तर तो गळ्यातच पडला.
पणशीकर चाळीत कुणीतरी साखर आणली. सगळ्या पोरांनी चाळकऱ्यांना साखर वाटली. त्या साखरेत जग जिंकल्याचा गोडवा होता.
शोरूमच्या बाहेर जल्लोषाला उधाण आले. कुणी एकमेकांना मिठ्या मारल्या तर कुणी एकमेकांसोबत नाचू लागले.
रेल्वे स्टेशनवरच्या प्रवाशांनाही इतका वेळ थांबल्याचं सार्थक झालं. जणू काळ थांबवू शकणाऱ्या ह्या जादूगाराचं त्यांना विलक्षण कौतुक वाटत होतं.
अवघा देश आनंदात न्हाऊन निघत होता. या ‘सचिन’ नावाच्या देवदूताच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडत होता.