वनडे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानला नेहमीच पराभूत करण्याचा विक्रम भारतीय संघाने शनिवारीही (दि. 14 ऑक्टोबर) कायम ठेवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानला पराभूत करत विश्वचषकात सलग 8वा विजय साकारला. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. या विजयानंतर भारतीय चाहते एकच जल्लोष करत आहेत. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याची मजा घेतली आहे.
खरं तर, या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंना आशा व्यक्त केली होती की, यावेळी स्पर्धेत त्यांना भारताविरुद्ध विजय नक्की मिळेल. यामध्ये ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखला जाणारा शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचाही समावेश होता. अख्तरने 13 ऑक्टोबर रोजी एक ट्वीट केले होते. हा एक कसोटी सामन्याचा फोटो होता, ज्यात तो सचिनच्या विकेटचा जल्लोष करताना दिसत होता. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये हॅशटॅग ठंड रखचा वापर करत लिहिले होते की, “उद्या असं काही करायचं असेल, तर…”
भारताच्या विजयानंतर हेच ट्वीट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने रीट्वीट केले. तसेच, त्याने लिहिले की, “माझ्या मित्रा, तुझा सल्ला ऐकला आणि सर्व काही थंड ठेवले.” आता सचिनचे हे ट्वीट सर्वांचे लक्ष वेधत आहे. नेटकरीही हे ट्वीट जोरदार व्हायरल करत आहेत.
सामन्याचा आढावा
या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार बाबर आझम याच्या अर्धशतकाच्या जोरावर 42.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 191 धावाच केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर (नाबाद 53) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 30.3 षटकातच 3 विकेट्स गमावत 192 धावा केल्या. तसेच, सामना 7 विकेट्सने खिशात घातला.
सचिनची विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आकडेवारी
खरं तर, महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची कामगिरी खूपच शानदार राहिली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध एकूण 5 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 78.25च्या जबरदस्त सरासरीने 313 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच, 98 ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. (master blaster sachin tendulkar hilarious response to shoaib akhtar after india defeated pakistan in wc 2023 must read)
हेही वाचा-
‘ही माझी पॉवर…’, अंपायरच्या ‘त्या’ प्रश्नाला रोहितचे बायसेप दाखवत उत्तर, कर्णधाराच्या तोंडूनच ऐका
‘एक मॅच मला खराब गोलंदाज…’, पाकिस्तानी कर्णधाराची विकेट घेणाऱ्या सिराजची सर्वात मोठी प्रतिक्रिया