‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज’चा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना मेलबर्न येथे चालू आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या मोठ्या आकडी खेळीनंतर पहिल्या डावात भारताने १३१ धावांनी आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर ६ बाद १३३ धावा करत २ धावांची आघाडी घेतली. कॅमरॉन ग्रीन आणि पॅट कमिन्स नाबाद फलंदाजी करत आहेत. या डावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेडसोबत मोठी दुर्घटना होता-होता टळली.
बुमराहचा चेंडू लागला वेडच्या हेल्मेटला
झाले असे की, दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड फलंदाजीसाठी मैदानावर आले. पुढे लवकरच बर्न्सने आपली विकेट गमावली. पण मॅथ्यू वेड टिकून फलंदाजी करत होता. अशात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह डावातील ३५ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने या षटकातील चौथा चेंडू अत्यंत वेगाने टाकला. हे पाहून फलंदाजी करत असलेल्या मॅथ्यू वेड स्वत:ला चेंडूपासून वाचवण्यासाठी खाली वाकला. तेवढ्यात चेंडू येऊन त्याच्या हेल्मेटवर जोराने आदळला.
त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी वेडची कन्कशन टेस्ट केली. दरम्यान वेडला जास्त दुखापत झाली नसल्याचे दिसले त्यामुळे त्याने पुढे फलंदाजी केली. अखेर ४४ व्या षटकात ३ चौकारांच्या मदतीने ४० धावा करत तो बाद झाला. भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने त्याला पायचित केले.
Thankfully Matthew Wade has passed the concussion test, has a new helmet and is right to continue after this nasty blow #AUSvIND pic.twitter.com/lN0StnlSdt
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2020
पहिल्या डावातही घडली होती अशी घटना
महत्त्वाचे म्हणजे, सामन्यादरम्यान कोणत्या खेळाडूच्या हेल्मेटला चेंडू लागण्याची ही पहिली वेळ नाही. याच सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मार्नस लॅब्यूशानेच्या हेल्मेटला चेंडू लागला होता.
ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव चालू असताना लॅब्यूशाने आणि ट्रॅविस हेड फलंदाजी करत होते. त्यावेळी वेगवान गोलंदाज सिराज डावातील ३६वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने वेगाने धावत येत षटकातील दुसरा चेंडू टाकला. त्याचा बाउंसर इतक्या वरुन आला की, तो थेट लॅब्यूशानेच्या हेल्मेटवर लागला. पण तपासादरम्यान त्याला कसलीही इजा झाली नसल्याने कळले; त्यामुळे त्याने पुढे फलंदाजी केली.
Labuschagne cops a ball to the helmet – he's in good spirits as the doctor assesses him #AUSvIND pic.twitter.com/IiH6oNuRsX
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2020
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बऱ्याचदा घडलीय ही घटना
यापुर्वीही बऱ्याचदा फलंदाजाच्या डोक्याला चेंडू लागल्याच्या घटना घडल्या आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या दौऱ्यावरच यापुर्वी अशी घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. कसोटी मालिकेपूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात तीन दिवसीय सराव सामना झाला होता. या सामन्यादरम्यान फलंदाजी करत असताना चेंडू डोक्यावर आदळल्याने पुकोस्कीला दुखापत झाली होती. तो अजूनही या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.
तसेच बॉक्सिंग डे कसोटीतून पुनरागमन केलेल्या भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजाच्याही डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाकडून शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना जडेजाच्या हेल्मेटलवर चेंडू लागला होता. त्यामुळे जडेजाने क्षेत्ररक्षण केले नव्हते. त्याच्याऐवजी त्याचा कन्कशन सबस्टिट्यूट (दुखापतीमुळे आलेला बदली खेळाडू) म्हणून युजवेंद्र चहल क्षेत्ररक्षणासाठी आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS : तिसऱ्या दिवसाखेर भारतीय गोलंदाजांचा बोलबाला; सामन्यावर भारताची मजबूत पकड
टीम इंडियाच्या अडचणीत भर! गोलंदाजी करताना उमेश यादव ‘असा’ झाला दुखापतग्रस्त, पाहा व्हिडिओ
रहाणेला बाद का दिलं? पाहा काय होतं नक्की तांत्रिक कारण?