सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर ओडिशा एफसीने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल)मॅचवीक 14मधील शनिवार (7 जानेवारी)स्पेशल लढतीत ईस्ट बंगाल एफसीवर 3-1 असा विजय नोंदवला. या विजयासह सलग दोन पराभवांची मालिका खंडित करतानाच यजमानांनी प्ले-ऑफ फेरीसाठीची दावेदारी कायम ठेवली.
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात फॉरवर्ड दिएगो मॉरिसिओ हा ओडिशाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पूर्वार्धात (22व्या मिनिटाला) एक आणि उत्तरार्धात (53व्या मिनिटाला) एक अशा दोन गोलांची भर घातली. शिवाय एक गोल करण्यास मदत केली. मॉरिसिओ याला नंदा कुमार सेकर याची सुरेख साथ लाभली. त्याने मध्यंतराचा खेळ संपायला काही सेकंद शिल्लक असताना (इंज्युरी टाइम) चेंडूला अचूक गोलजाळ्यात धाडले.
ईस्ट बंगालने आश्वासक सुरुवात केली. दहाव्या मिनिटालाच गोल झाला. त्याचे क्रेडिट ब्राझीलच्या अलेक्स लिमा आणि क्लीटन सिल्वा यांना जाते. लिमा याने प्रतिस्पर्धी खेळाडूकडून चेंडू हिरावून घेत गोलक्षेत्राकडे धाव घेतली. त्यानंतर उजव्या बाजूने त्याने क्लीटनकडे चेंडू सोपवला. अमरिंदर सिंगने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिल्वाने त्याला चुकवत चेंडूला गोलपोस्टमध्ये धाडला.
मात्र, सुरुवातीची आघाडी केवळ 12 मिनिटे टिकली. 22व्या मिनिटाला रेनियर फर्नांडेसच्या सुरेख पासवर फॉरवर्ड मॉरिसिओ याने यजमानांना 1-1 अशी बरोबरी साधून दिली.पूर्वार्धातील इंज्युरी टाइममध्ये मॉरिसिओच्या पासवर नंदा कुमारने गोल करताना ओडिशाची आघाडी 2-1 अशी वाढवली.
उत्तरार्धात मॉरिसिओ पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला. वैयक्तिक दुसर्या गोलसह त्याने ओडिशाच्या आघाडी 3-1 अशी भर घातली. शेवटच्या अर्ध्या तासात दोन्ही संघांनी अनेक बदल केले. 67व्या मिनिटाला थाँगखोसियम हा ओकिप याने सुरेख प्रयत्न केला. मात्र, ओडिशाचा गोलकीपर अमरिंदर सिंगने त्याचा फटका अडवला. 73व्या मिनिटाला कॅरालॅम्बॉस किरियाकाउने मारलेला चेंडूही क्रॉसबारवरून गेला.
ईस्ट बंगालवरील विजयाने ओडिशाचे 13 सामन्यांतून 22 गुण झालेत. त्यांनी गुणतालिकेत अव्वल पाच संघात स्थान मिळवत प्ले-ऑफची दावेदारी कायम ठेवली. ओडिशाचा हा सातवा विजय आहे. ईस्ट बंगाल एफसीचा 12 सामन्यांतील हा आठवा पराभव आहे. त्यांच्या खात्यात 12 गुण आहेत.
निकाल- ओदिशा एफसी-3(दिएगो मॉरिसिओ 22व्या मिनिटाला आणि 53व्या मिनिटाला, नंदा कुमार सेकर 45+2व्या मिनिटाला) विजयी वि. ईस्ट बंगाल एफसी-1(क्लीटन सिल्वा दहाव्या मिनिटाला).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंडियन सुपर लीग: चेन्नईयिनने जमशेदपूरला बरोबरीत रोखले
सूर्यकुमारने शतक झळकावलं, पण रोहितसारखी कामगिरी करण्यात पडला मागे; बातमी वाचाच