ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या बिग बॅश लीग २०२१ मध्ये दररोज एकाहून एक जबरदस्त झेल आणि क्षेत्ररक्षणाची उदाहरणे पाहायला मिळतात. नुकताच ब्रिसबेन हिट आणि मेलबर्न स्टार्स संघात पार पडलेल्या हंगामातील ३२व्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. या सामन्यात ब्रिस्बेन हिटचा एक खेळाडू मॅक्स ब्रायंट याने अनपेक्षित क्षेत्ररक्षण करत षटकार अडवला. त्याचे क्षेत्ररक्षण इतके गजब आणि अश्विसनीय होते की, दर्शकांसह, स्वत: फलंदाज आणि ब्रिसबेन हिटचे सर्व खेळाडूही अवाक् झाले.
मॅक्स ब्रायंटचे जबरदस्त क्षेत्ररक्षण
झाले असे की, मेलबर्न स्टार्स संघाच्या डावातील नववे षटक चालू होते. स्ट्राईकवर असलेल्या मेलबर्न स्टार्सचा फलंदाज निक लार्किनने वेगवान गोलंदाज लेविस ग्रेगरीच्या एका चेंडूवर जोरदार षटकार मारला. त्याच्या षटकाराचा चेंडू मिड-विकेटच्या वरुन सीमारेषेपार जाणार असल्याचे दिसत होते. तेवढ्यात सीमारेषेजवळ उभा असलेल्या ब्रायंटने हवेत जबरदस्त उडी घेतली आणि एका हाताने चेंडूला आत ढकलले व स्वत: सीमारेषेबाहेर पडला. त्यानंतर त्वरित त्याच्या संघसहकाऱ्याने चेंडू घेतला आणि क्रिजच्या दिशेने फेकला.
अशाप्रकारे मलबर्न स्टार्स संघाला त्या चेंडूवर ६ ऐवजी फक्त २ धावा मिळाल्या. मात्र ब्रायंटचे अचंबित करणारे क्षेत्ररक्षण पाहून समालोचक आणि फलंदाज निक लार्किन दंग झाले. बीबीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ब्रायंटच्या क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Max Bryant had no right to save this from going for six! 😲 #BBL10 pic.twitter.com/BxOM1YEm0u
— KFC Big Bash League (@BBL) January 7, 2021
मेलबर्न स्टार्सचा पराभव
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ब्रिस्बेन हिटने मेलबर्न स्टार्सला १७ धावांनी पराभूत केले आहे. ब्रिस्बेन हिटने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ३ विकेट्स गमावत ११५ धावा केल्या होत्या. परंतु पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आणि मेलबर्न स्टार्सला १० षटकात १२९ धावांचे आव्हान मिळाले.
प्रत्युत्तरादाखल मेलबर्न स्टार्स संघ १० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १११ धावाच करु शकला. त्यामुळे ब्रिस्बेन हिटच्या खात्यात अजून एका सामना विजयाची नोंद झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत; पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद २४९ धावा
‘या’ कारणांमुळे सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने गाजवले वर्चस्व