टी20 विश्वचषकात शुक्रवारी (5 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका हा महत्त्वाचा सामना खेळला गेला. अ गटातील या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीचे भविष्य अवलंबून होते. इंग्लंडने श्रीलंकेला 4 गड्यांनी पराभूत करत उपांत्य फेरीत आपली जागा बनवली. इंग्लंडच्या विजयाने यजमान व गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचे या विश्वचषकातील उपांत्य फेरीचे तिकीट श्रीलंकेच्या हाती होते. ऑस्ट्रेलियाने तीन विजय, एक पराभव व एका रद्द झालेल्या सामन्याच्या गुणासह 7 गुण कमावले होते. मात्र, त्यांचा रनरेट इंग्लंडपेक्षा कमी होता. अशा परिस्थितीत केवळ इंग्लंडचा पराभव त्यांना उपांत्य फेरीत घेऊन जाऊ शकला असता. परंतु, इंग्लंडने श्रीलंकेला ही संधी न दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मॅक्सवेल म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आमचा संघ संपूर्ण स्पर्धेत कधीच एकत्रित खेळला नाही. सर्व खेळाडूंनी तुकड्यांत चांगली कामगिरी केली. मागील वर्षी वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी केली होती. यावेळी आम्ही अनेक संधी गमावल्या. फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली मात्र ते मोठ्या खेळ्या करू शकले नाहीत. आमचे कोणीही फलंदाज अथवा गोलंदाज पहिल्या पाचमध्ये नव्हते.”
संपूर्ण विश्वचषकात मॅक्सवेल हा फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याला जवळपास सर्व सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. केवळ अफगाणिस्तान विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावत सामनावीर पुरस्कार मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप ठरूनही कार्तिकला मिळाला भारतीय दिग्गजाचा भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘इतर खेळाडूही फ्लॉप…’
श्रीलंकेला नमवत इंग्लंड सेमी-फायनलमध्ये! यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात