आयपीएल २०२२ (IPL 2022) चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे होणार असुन या लिलावामध्ये सर्व फ्रॅंचायझी आपले संघ तयार करताना दिसतील. पुढील तीन वर्षांसाठी पुन्हा एकदा मजबुत संघ तयार केले जातील. पण काही संघ असेही आहेत, ज्या संघाना या लिलावात कर्णधार शोधायचा आहे. त्या संघांना या लिलावात खेळाडूंसोबतच एक चांगला कर्णधार सुद्धा शोधायचा आहे. पंजाब किंग्ज हा संघ त्यापैकीच एक आहे. या संघाला सुद्धा सध्या कर्णधार नाही. ही जबाबदारी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
मागीत काही वर्षांत पंजाब किंग्ज संघ प्ले ऑफपर्यंत पोहचला होता, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या हंगामात तरी त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची आशा आहे. त्याचबरोबर संघाला कर्णधार म्हणून अशा चेहऱ्याची गरज आहे, जो स्वत: चांगली कामगिरी करू शकेल, तसेच संघाला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू शकेल. गेल्या दोन मोसमात संघाचा कर्णधार असलेला केएल राहुल आता लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीचा कर्णधार झाला आहे.
पंजाब किंग्ज संघाने यंदा मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना संघात रिटेन केले आहे. त्यामुळे मयंकला कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे, परंतु फ्रॅंचायझीला याबाबत खात्री नाही. त्यामुळे लिलाव संपेपर्यंत त्यांना कोणतीही घोषणा करायची नाहीये.
एका क्रिकेट वेबसाईटच्या अहवालानुसार, पीबीकेएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, “आमच्याजवळ खुप वेळ आहे. सध्या तरी कर्णधार जाहीर करण्याची काही घाई नाही. लिलाव कसा होतो ते पाहू आणि मग कर्णधारपदाचा निर्णय घेऊ. मयंक हा नक्कीच एक पर्याय आहे, पण आम्ही लिलावापर्यंत वाट पाहू.”
मयंक अग्रवाल मागच्या ३ हंगामांपासून पंजाब किंग्ज संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने राहुलसोबत फलंदाजीत उत्कृष्ट योगदान दिले आहे. पण कर्णधारपदाच्या बाबतीत त्याला अनुभव नाही. त्याने आत्तापर्यंत कोणत्याही संघाचे नेतृत्व केलेले नाही. मागच्या हंगामात त्याने केएल राहुलच्या अनुपस्थितीत त्याने पंजाब संघाचे एका सामन्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. त्याने त्याच्या कर्नाटक राज्याच्या संघासाठी ही सुद्धा जबाबदारी निभावलेली नाही. या कारणांमुळेच फ्रॅंचायझी इतर पर्यायांकडे सुद्धा पाहतील.
महत्त्वाच्या बातम्या-
तमिळ थलाईव्हाजचा तेलुगू टायटन्सवर एकतर्फी विजय, ४३-२५ च्या फरकाने मारली बाजी
क्रिकेटर असताना नशिबी आला नाही एकही विश्वचषक, आता लक्ष्मण प्रशिक्षकाच्या रूपात उंचावणार ट्रॉफी?