मुंबई। डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर मंगळवारी (३ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ४८ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. हा सामना पंजाब किंग्सने १६ व्या षटकातच एकतर्फी जिंकला. पंजाबच्या विजयाचा हिरो कागिसो रबाडा तर ठरलाच, पण फलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. पण, या सामन्यादरम्यान पंजाबच्या फलंदाजी फळीत मोठे बदल करण्यात आले होते. याबद्दल सामन्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अगरवाल याने प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात गुजरातने पंजाबसमोर १४४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून सलामीला जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन आले होते. याआधी मयंक शिखरसह सलामीला यायचा, पण या सामन्यासाठी बेअरस्टोला सलामीची संधी देण्यात आली. पण त्याला याचा फायदा घेता आला नाही, तो १ धाव करून बाद झाला. पण शिखरने नाबाद ६२ धावांची खेळी केली. तसेच तिसऱ्या क्रमांकावर भानुका राजपक्षे आला होता आणि चौथ्या क्रमांकावर लियाम लिव्हिंगस्टोनला बढती देण्यात आली.
राजपक्षेने आक्रमक फलंदाजी करताना २८ चेंडूत ४० धावा केल्या. तसेच लिव्हिंगस्टोनने चौथ्या क्रमांकावर खेळायला येत १० चेंडूत नाबाद ३० धावांची खेळी केली. यातील २८ धावा त्याने १६ व्या षटकात पूर्ण केल्या. त्याने मोहम्मद शमी गोलंदाजी करत असलेल्या या षटकात सलग ३ षटकार आणि २ चौकारांसह या २८ धावा काढल्या आणि पंजाबला विजय मिळवून दिला.
या सामन्यात फलंदाजी फळीत झालेल्या बदलांबद्दल सामन्यानंतर मयंक म्हणाला, ‘कागिसो रबाडाने चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळे आम्हाला छोटे आव्हान मिळाले होते. शिखर आणि राजपक्षे यांनी चांगली भागीदारी केली. आता आम्हाला सलग सामने जिंकायचे आहेत. जॉनी बेअरस्टोने डावाची सुरुवात करावी, हा निर्णय यासाठी घेण्यात आला होता की, त्याने या भूमिकेत आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मी स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा विचार केला होता. पण आमच्या डोक्यात नेट रनरेट देखील होता. त्यामुळे लिव्हिंगस्टोनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.
तसेच मयंकने गोलंदाजांचेही कौतुक केले. तो म्हणाला की, पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत गुजरातला कमी धावसंख्येत रोखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. या सामन्यात कागिसो रबाडाने ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. तसेच वृद्धिमान साहाने २१ धावा केल्या. अन्य कोणाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे गुजरातने २० षटकात ८ बाद १४३ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! लिव्हिंगस्टोनचा ११७ मीटरचा षटकार अन् गोलंदाजासह कर्णधारही चकीत; राशिदने तर बॅटही तपासली
बापरे बाप! विराट अन् रैनाला मागे टाकत धवन ‘या’ विक्रमात पोहोचला शिखरावर, ‘हिटमॅन’शी साधली बरोबरी
ऋषी धवनच्या डायरेक्ट थ्रोमुळे कोलमडला गुजरात टायटन्सचा डाव, शुबमन गिलने स्वस्तात गमावली विकेट