भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या घरी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पाळणा हलणार आहे. वडील आणि खेळाडू या दोन्ही जबाबदाऱ्या संतुलितपणे पार पाडण्यासाठी सहा वेळा विश्वविजेता बनलेली भारतीय बॉक्सर एमसी मेरी कोमकडून त्याला काही टिप्स घ्यायच्या आहेत.
मेरी कोमने सांगितलेल्या मार्गाने जायचेय
कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी पुढच्या वर्षी जानेवारीत पहिल्या बाळाचे आगमन होईल. कोहली मेरी कोमशी केलेल्या इंस्टाग्राम चाटमध्ये म्हणाला की, “पालकांच्या भूमिकेत आणि व्यस्त कारकिर्दीत संतुलन साधण्यात तुमच्यापेक्षा चांगली कोणती व्यक्ती असेल असे मला वाटत नाही.” स्टार बॉक्सर आणि चार मुलांची आई मेरी कोम हिने सांगितलेल्या मार्गाने मला जायचे आहे असेही तो म्हणाला
कुटुंबाच्या मदतीने झाले शक्य
दोघांच्या दरम्यान झालेल्या संभाषणापूर्वी मेरी कोमने कोहली व अनुष्काचे अभिनंदन केले. कोहलीने 37 वर्षीय मेरी कोमला विचारले की, “तुम्ही आई आहात. तुम्ही सराव केला, बर्याच चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला, आई असूनही तुम्ही खेळात आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन कसे साधले?”
यावर मेरी म्हणाली की “कुटुंबाच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. लग्नानंतर माझ्या नवऱ्याने मला खुप सहकार्य केले. त्याने मला खूप आधार दिला. त्याने मला पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. तो आदर्श नवरा आणि वडील आहे. याशिवाय माझी मुलंही कुणापेक्षा कमी नाहीत.”
…स्वतःला समजतो भाग्यवान
पुढे बोलताना कोहली म्हणाला, “तुम्ही सतत पुढे जात होत्या आणि आपला मार्ग सुकर करत होत्या. तुमच्या आयुष्यातून प्रत्येकजण प्रेरणा घेऊ शकतो. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.”
कोणतेही आई-वडील घेऊ शकतात प्रेरणा
मेरी कोमच्या यशाबद्दल बोलताना कोहली म्हणाला, “कोणतेही आई-वडील मेरी कोमने दाखविलेल्या मार्गाने जाऊ शकतात. ती केवळ देशातील महिलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच आदर्श आहे. कमी सुविधा व इतर आव्हाने असूनही तिने खेळात यश मिळवून दाखवले.”
“आम्ही पालक होणार आहोत. तुमच्या कार्यातून आम्ही प्रेरणा घेतो. आम्ही तुम्ही सांगितलेल्या मार्गांवरच जाऊ.” असेही पुढे बोलताना कोहली म्हणाला.