भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या या जन्मदिनी त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएकडून एक मोठी भेट मिळाली आहे. गावसकर आणि त्यांच्या पत्नीसाठी वानखेडे स्टेडिअममध्ये पुन्हा २ स्थायी जागा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे.
यापूर्वीही ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअममध्ये (Wankhede Stadium) गावसकर आणि त्यांच्या पत्नीसाठी २ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.
एमसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ९ वर्षांपूर्वी जेव्हा स्टेडिअमचे नुतनीकरण झाले होते आणि मैदान पुन्हा तयार करण्यात आले होते, त्यामुळे गावसकर (Sunil Gavaskar) आणि त्यांच्या पत्नीच्या जागा गेल्या होत्या. मागील वेळीप्रमाणे या २ जागाही अध्यक्षांच्या बॉक्समधील असतील. या जागांवर गावसकर आणि त्यांची पत्नी कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना मोफत पाहू शकतात. मग तो सामना आंतरराष्ट्रीय असो किंवा मायदेशातील असो किंवा आयपीएल असो ते मोफत पाहू शकतात.
१९७४ मध्ये बनलेल्या या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता सुरुवातीला ४५००० होती. परंतु २०११च्या अंतिम सामन्यासाठी हे स्टेडिअम पुन्हा तयार करण्यात आले होते. आणि त्यावेळी या स्टेडिअमची प्रेक्षक क्षमता ३३ हजारांच्या आसपास होती. त्यादरम्यान गावसकर आणि त्यांच्या पत्नीला मिळालेल्या जागांचा त्यात नव्याने समावेश करण्यात आला नव्हता. तरीही आता पुन्हा त्यांना अध्यक्षांच्या बॉक्समध्ये बसून सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
वानखेडे स्टेडिअमशी भारतीय संघाचे खूपच जवळचे नाते आहे. कारण या स्टेडिअममध्ये भारतीय संघाने आपला दुसरा विश्वचषक २०११ साली जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत विजेतेपद उंचावला होता. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपला शेवटचा आंंतरराष्ट्रीय सामनाही याच स्टेडिअममध्ये खेळला होता. इतकेच नव्हे, तर याच स्टेडिअममध्ये रवी शास्त्रींना (Ravi Shastri) एका षटकात ६ षटकार ठोकले होते. अशाप्रकारे भारतीय क्रिकेट संघासाठी या स्टेडिअमचे एक वेगळेच महत्त्व आहे.