देशासाठी खेळणे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी स्वप्न असते. अशात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवण्यासाठी खूपच नशीब आणि परिश्रम लागतात. दिल्लीच्या जनकपुरीमध्ये राहणाऱ्या यश धूल (yash dhull) याला हे भाग्य लाभले आहे. आगामी काळात यूएईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या १९ वर्षाखालील आशिया चषकात (under 19 asia cup) यश भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यशला या कर्णधारपदापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी खूपच सहकार्य केले आहे. यासाठी यशच्या वडिलांना त्यांची नोकरी देखील सोडावी लागली होती.
एका वृत्तपत्राशी बोलताना यशने त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे. यशच्या मते जर तो इमानदारीने खेळत राहिला, तर नक्कीच वरच्या स्तरावर पोहोचू शकेल. मुलाला भारतीय संघाचा कर्णधार झालेले पाहून त्याचे वडील विजय आनंदी आहेत आणि यासाठी घेतलेले परिश्रम त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहत आहे.
ते म्हणाले की, “जर तुमची इच्छा आहे की, तुमच्या मुलाने दिल्लीसारख्या शहरात क्रिकेटमध्ये कारकीर्द बनवावी. तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये तडजोडी कराव्या लागतील. मला हे सुनिश्चित करायचे होते की, मी यशला पूर्ण वेळ देईल. जेणेकरून तो इकडे तिकडे भटकण्याऐवजी क्रिकेटवर पूर्ण लक्ष देईल. त्यामुळे मी माझ्या कारकिर्दीचा विचार नाही केली आणि नियमित नोकरी सोडली होती.”
“मला हे सुनिश्चित करायचे होते की, त्याला लहान वयापासूनच खेळण्यासाठी चांगले किट मिळावे. मी त्याला सर्वोत्तम इंग्लिश विलो बॅट दिल्या. यशकडे फक्त एक बॅट नव्हती, मी सतत बॅट बदलत राहिलो. आम्ही आमचा खर्च कमी केला. माझे वडील एक सैनिक होते. निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या पेंशनमधून घरचा खर्च चालायचा. यशला नेहमी वाटायचे की, आम्ही त्याच्यासाठी हे सगळ कसे करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
यशमधील क्रिकेटची आवड सर्वात आधी त्याच्या आईच्या लक्षात आली होती. याबाबत त्याच्या वडिलांनी सांगितले की, “पत्नीने पहिल्यांदा ४ वर्षाच्या यशमधील चेंडूची समज आणि क्रिकेटमधील आवड पाहिली. तिने मला आणि यशच्या आजोबांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर कुटुंबाला असे वाटले की यशला क्रिकेटपटू बनवले जाऊ शकते. त्यानंतर घराच्या छतावर यशने क्रिकेटला सुरुवात केली.”
यश त्याच्या कारकिर्दीबाबत बोलताना म्हणाला की, “खूप साऱ्या गोष्टी मला लक्षात नाहीत. पण जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती तेव्हा माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कुटुंबाला वाईट काळ पाहावा लागला. त्यांनी माझ्यासाठी खूप काही सहन केले आहे. पण आता वाटत आहे की, कुटुंबाचा संघर्ष हळूहळू यशामध्ये बदलत आहे.”
यश आता लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादामीत (nca) भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत सामील होण्यासाठी बेंगलोरला रवाना होईल. यापूर्वी त्याने दिल्लीच्या १६ वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि नुकत्याच पार पडलेल्या चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये १९ वर्षांखालील अ संघाचे नेतृत्व केले आहे. अशात आगामी काळात एशिया चषकात देखील तो भारतीय संघाचे चांगले नेतृत्व करेल अशी आशा आहे.
महत्वाच्या बातम्या –
Photo: जसा बाप, तसा मुलगा…! आपल्यापासून दूर असलेल्या मुलाशी धवनचा व्हिडिओ कॉलद्वारे प्रेमळ संवाद
धक्कादायक! सरावानंतर २७ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अहमदनगरमधील घटना
ऋतुराजची शतकांची हॅट्रिक! महाराष्ट्राचे नेतृत्त्व करताना विजय हजारे ट्रॉफीत पाडलाय धावांचा पाऊस