भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (28 नोव्हेंबर) क गटामधील दुसरा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगला. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात भारताकडून सिम्रनजीत सिंगने दोन तर मनदिप सिंग, आकाशदिप सिंग, ललित कुमार उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल केला.
भारताने आक्रमक सुरूवात करत पहिल्या सत्रातच गोल केला. यावेळी 10व्या मिनिटाला मनदिपने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 2 मिनिटांच्या अंतराने आकाशदिपने गोल केला.
दुसऱ्या सत्रालाही भारताने चांगली सुरूवात केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही चांगला खेळ केला. मात्र दुसरे सत्र संपले असता भारत 2-0 असा आघाडीवर राहिला. भारताच्या सिम्रनजीतने उत्तम खेळ केला.
तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने साजेसा खेळ केला. यावेळी भारताला या सामन्यातील 34व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले.
43व्या मिनिटाला भारताच्या सिम्रनजीत सिंगने गोल करत संघाची आघाडी कायम ठेवली. भारतीय गोलकिपर पीआर श्रीजेशनेही दक्षिण आफ्रिकेचे अनेक हल्ले परतवून लावले. हे सत्र संपण्यास काही सेंकद बाकी असतानाच ललित कुमार उपाध्यायने भारताकडून चौथा गोल केला.
46व्या मिनिटाला सिम्रनजीत सिंगने या सामन्यातील दुसरा गोल केल्याने सामना 5-0 असा झाला.
तसेच 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यामध्ये भारताने 5-2 असा विजय मिळवला होता. सुमारे चार वर्षानंतर हे दोन संघ आज आमने-सामने आले होते.
भारताने 43 वर्षांपूर्वी म्हणजेच 1975ला अजित पाल सिंगच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता.
विश्वचषकात हे दोन संघ चारवेळा आमने-सामने आले आहेत. तीन सामने अनिर्णीत राहिले तर एक सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आजच्याही सामन्यात भारताने विजय मिळवत आम्हीच सरस हे सिद्ध केले.
या सामन्याचा नायक ठरला सिम्रनजीत सिंग. त्याने दोन गोल केल्याने त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
जागतिक क्रमवारीत भारत 5व्या तर दक्षिण आफ्रिका 15व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात
–Video: गोलंदाजांना सराव देताना तोल गेल्याने स्मिथ पडला खाली
–विकेटकीपर म्हणून पार्थिवच हवा, रिषभ पंत नकोच