---Advertisement---

T20 WC26: सहभागाबाबत आइसलंड क्रिकेटने घेतली पाकिस्तानची फिरकी! म्हणाला ‘खेळण्यास आम्ही तयार, मात्र…’

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 9:01 AM
---Advertisement---

पुरूष संघांचा टी२० विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंकेत येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत २० संघ खेळणार असून १७ सहभागी देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे, मात्र ते या स्पर्धेत खेळणार का नाही हे निश्चित नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयावर आइसलंड क्रिकेटने मात्र चांगलीच मजा घेतली आहे.

आइसलंड क्रिकेट नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया ”एक्स’च्या अकाऊंटवर अनेकांची फिरकी घेत असतात. आता त्यांनी पाकिस्तानला ट्रोल करत “लवकर निर्णय घ्या, आम्ही खेळण्यास तयार आहोतच”, असे म्हटले.

बांग्लादेश क्रिकेटने या स्पर्धेतून आधीच माघार घेतली आहे. त्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे या स्पर्धेतून काढता पाय घेतल्याने त्यांच्या जागी स्कॉटलंड या विश्वचषकात खेळणार आहे. त्यासाठी आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना) अधिकृत घोषणा केली असून स्कॉटलंडनेही त्यांचा संघ जाहीर केला आहे.

बांग्लादेशसोबत एकता दाखवण्यासाठी पाकिस्तानेही या स्पर्धेतून माघार घेण्याचे वक्तव्य केले होते. त्याबाबत नक्वींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेटही घेतली होती. त्या भेटीमध्ये पंतप्रधानांनी विचार करून योग्य तो निर्णय घ्या, असे सांगितले. त्यानंतर नक्वींनी पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही हे या शुक्रवारी किंवा सोमवारपर्यंत सांगू असे विधान केले होते. त्यांच्या या विधानांवर अनेक दिग्गजांनी पाकिस्तानला न खेळण्याचा सल्ला दिला.

आइसलंडने तर त्यांना ‘आम्ही कधीपासून तयार आहोत’ असेही म्हटले. त्याबद्दल पोस्ट करताना आइसलंड क्रिकेटने म्हटले, ‘टी२० विश्वचषकातील सहभागाबाबत पाकिस्तानने लवकरच निर्णय घेणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
२ फेब्रुवारीला त्यांनी माघार घेताच आम्ही निघायला तयार आहोत, पण ७ फेब्रुवारीपर्यंत कोलंबोमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी विमानाचे वेळापत्रक जुळवणे ही एक मोठी डोकेदुखी आहे. तसेच आमच्या सलामीच्या फलंदाजला जरा झोपेचा त्रास आहे.’

त्याचबरोबर आइसलंडने आता त्यांच्या सोशल मीडियाच्या अकांऊटवर आयसीसीला टॅग करत ‘ते स्पर्धेसाठी वेळेत पोहचणार नाहीत, यामुळे आम्ही खेळू शकत नाही. आमच्याजागी युगांडाला संधी द्या’, असे पोस्ट केले आहे.

पाकिस्तान या स्पर्धेत गट अ (ए) मध्ये आहे. यामध्ये भारत, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलॅंड्स आहेत. या स्पर्धेची सुरूवात पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्या सामन्याने होणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेत त्यांचे नेतृत्व सलमान आगा करणार असून संघात बाबर आझमला निवडले आहे, तर मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांना दुर्लक्षित केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---