भारतीय हॉकी पुरुष अंडर -18 संघाने शनिवारी (6 जून) आशिया कप 2026 जिंकून आशियामध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जपानमधील काकामिगाहारा येथिल कावासाकी हेवी इंडस्ट्रीज हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. या सामन्यात सुरूवातीपासूनच भारताने अप्रतिम खेळ केला.
अंतिम सामन्यात भारताचा स्टार खेळाडू पूर्ती आशिष तानीने शानदार हॅट्ट्रीक (2′, 28′, 34′) साधून विजयात महत्त्वाची भुमिका बजावली. कर्णधार केतन कुशवाहानेही (30′) एक गोल केला. जपानकडून एकमेव गोल नुमाडा गाकूने (52′) केला. या सामन्यात भारतीय संघाने सुरूवातीपासूनच आपले नियंत्रण राखत यजमानांची चांगलीच दमछाक केली. भारताने चेंडूवर आपले नियंत्रण ठेवले आणि आपल्या अथक आक्रमणानी सामना एकतर्फी बनवला.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने आपला प्रभाव दाखवण्यात जराही वेळ घालवला नाही. पहिल्या 90 सेंकदांच्या आतच एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. आशिषने कोणतीही चूक न करता त्याचे गोलमध्ये रुपांतर केले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये यजमानांचा दबाव कायम असूनही भारताने आपली आघाडी वाढवली. जपानने सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि ते धोकादायक वाटत होते, पण बरोबरी साधण्यात त्यांना यश येत राहिले.
भारताने जोरदार प्रत्युत्तर देत 28 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. त्यावर आशिषने जोरदार शॉट मारत गोल केला आणि आघाडी 2-0 अशी केली. सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला होता, कारण कर्णधार केतनने गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी केली. पुढे वरिंदर सिंगमुळे भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि 34 व्या मिनिटाला आशिषने आपली हॅट्ट्रीक पूर्ण केली. जपानने काहीसे प्रयत्न केले. गाकूने 52 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात आपले आव्हान राखण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. भारताने एक अविस्मरणीय विजय मिळवत आपले विजेतेपद निश्चित केले.
उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानविरुद्धचा रोमांचक सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामधील शेवटच्या क्वार्टरमध्ये प्रवेश करताना भारत 3-2ने पिछाडीवर होता, परंतु खेळाडूंनी सामन्याच्या अंतिम मिनिटांत पूर्णपणे चित्र पालटले आणि 5-3 असा विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या रोमांचक सामन्यातही एकूण चार गोल करत पूर्ती आशिष तानी विजयाचा शिल्पकार ठरला होता.
भारतासाठी हे विजेतेपद खास ठरले, कारण यावरून सिद्ध होते की भारतीय युवा खेळाडू नवनवे उंची गाठत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतीय हॉकीमध्ये अनेक नवीन तारे उद्यास येतील. दुसरीकडे याच स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदकाच्या सामन्यात दक्षिण कोरियाला 3-0 ने पराभूत केले.
संघांच्या कामगिरीची दखल घेत हॉकी इंडियाने सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले. तसेच कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय 18 वर्षांखालील महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 50,000 रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले.
या स्पर्धेत भारतीय संघामध्ये जपान रौप्यपदक आणि पाकिस्तान कांस्यपदकाचा मानकरी ठरला. महिलांमध्ये






