भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या टी२० विश्वचषकासाठी तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वीच तो इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात खेळताना दिसला होता. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे त्याने अखेरच्यावेळी नेतृत्त्व केले. तसेच आगामी टी२० विश्वचषकातही तो भारताचा टी२० कर्णधार म्हणून अखेरच्यावेळी खेळणार आहे. दरम्यान, सध्या तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
विराट सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याने शनिवारी सोशल मीडियावर एका लहान मुलाच्या डान्सच्या व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. याबरोबरच त्याने ट्विटरवर लिहिले की ‘या मुलांमधील प्रतिभा पाहून मंत्रमुग्ध झालो. संचित, तू असाधारणच्याही पलीकडे आहे. तुला सलाम. इश्वर तुला आशिर्वाद देवो. तुझा डान्स पाहून अंगावर काटे आले.’
Blown away and mesmerised by this kids talent @sanchitstyle. He is beyond exceptional. Hats off to you god bless you. Had goosebumps watching him dance. 🙏🏼 https://t.co/1pccij1jXE
— Virat Kohli (@imVkohli) October 16, 2021
विराटने इंस्टाग्राम स्टोरीवरही हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की ‘असं खूप क्वचित झालं आहे की एखाद्याची वैयक्तिक प्रतिभा पाहून मी चकीत आणि मंत्रमुग्ध झालो आहे. आत्तापर्यंत केवळ अरजीत सिंगच्याच प्रतिभेने मी भावूक झालो होतो आणि आता लहान मुलांचे युट्यूबवरील व्हिडिओ पाहून चकीत झालो. या व्हिडिओमुळे माझ्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच्या दैवी प्रतिभा पाहून मी पुन्हा भावूक झालो, मी यापूर्वी कधीही असा अनुभव घेतला नव्हता. इश्वर तुला आशिर्वाद देवो आणि तुझे रक्षण करो.
विराटने शेअर केलेला व्हिडिओ संचित नावाच्या लहान मुलाचा आहे. तो पंजाबचा रहिवासी असून सुपर डान्सर या टीव्ही शोच्या चौथ्या हंगामाचा उपविजेता राहिला आहे. त्याने वयाच्या १० व्या वर्षीय अनेक मोठमोठ्या दिग्गजांची वाहवा मिळवली आहे.
टी२० कर्णधार म्हणून विराटचा अखेरचा विश्वचषक
विराटने काहीदिवसांपूर्वीच तो आगामी टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे विराट टी२० कर्णधार म्हणून यंदाच्या टी२० विश्वचषकात शेवटचे खेळताना दिसेल. त्यानंतर तो टी२० संघात केवळ खेळाडू म्हणून खेळणार आहे. टी२० विश्वचषकात भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
तसेच विराटने आयपीएल २०२१ च्या हंगामानंतर बेंगलोर संघाचेही कर्णधारपद सोडले आहे. असे असले तरी त्याने हे देखील स्पष्ट केले की तो अखेरपर्यंत बेंगलोर संघाकडूनच खेळत राहिल.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: आयपीएल ट्रॉफी घेऊन ऋतुराजची हॉटेलमध्ये दिमाखात एन्ट्री, सीएसकेने केला विजयी जल्लोष
चेन्नईला विजेतेपद जिंकून देणारे प्रशिक्षक आता टी२० विश्वचषकात बनवणार धोनीला हरवण्याचा प्लॅन
चेन्नईचे कट्टर समर्थक आहात ना? मग ‘या’ आठ जणांविषयी तुम्हाला माहीतच हवे