शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात शनिवारी (२ ऑक्टोबर) डबल हेडर रंगले. या दिवसातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात मुंबईने २० षटकांत ८ बाद १२९ धावा करत दिल्लीसमोर विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १९.१ षटकात ६ विकेट्स गमावत १३२ धावा करत पूर्ण केला. या पराभवामुळे मुंबईसाठी प्लेऑफची शर्यत आणखी कठीण झाली आहे.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण, हे दोघे फार काळ टिकू शकले नाहीत. शिखर दुसऱ्या षटकात ८ धावांवर धावबाद झाला. तर तिसऱ्या षटकात कृणाल पंड्याने पृथ्वी शॉला ६ धावांवर पायचीत केले. ५ व्या षटकात स्टिव्ह स्मिथही ९ व्या षटकात त्रिफळाचीत झाला. त्याला नॅथन कुल्टर नाईलने बाद केले. यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पंत खेळपट्टीवर स्थिरावला असताना जयंत यादवच्या गोलंदाजीवर ९ व्या षटकात २६ धावांवर हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले.
यानंतर अक्षर पटेलने श्रेयस अय्यरची साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ट्रेंट बोल्टने १२ व्या षटकात ९ धावांवर पायचीत केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिमरॉन हेटमायरने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो ८ चेंंडूत १५ धावांवर असताना जसप्रीत बूमराहने त्याला रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
अखेर श्रेयस अय्यरने आर अश्विनला साथीला घेत संघाला विजयापर्यंत पोहचवले. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी ४ धावांची गरज असताना अश्विनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी श्रेयस अय्यरने संयमी पण महत्त्वपूर्ण ३३ धावांची नाबाद खेळी केली. अश्विनने नाबाद २० धावा केल्या.
मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, नॅथन कुल्टर नाईल, जसप्रीत बूमराह आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिल्लीची शानदार गोलंदाजी
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने सलामीला फलंदाजी केली. पण हे दोघे चांगली सुरुवात देण्यास अपयशी ठरले. रोहितला दुसऱ्या षटकात आवेश खानने ७ धावांवर बाद केले. त्यानंतर सूर्यकुमारने डी कॉकला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण डी कॉक ७ व्या षटकात १९ धावा करुन अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
त्यानंतर ११ व्या षटकात अक्षरने सूर्यकुमारचाही अडथळा दूर केला. सूर्यकुमार ३३ धावांवर रबाडाकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर मात्र मुंबईच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स घालवल्या. सौरभ तिवारी १३ व्या षटकात अक्षर पटेल विरुद्धच खेळताना १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर १५ व्या षटकात कायरन पोलार्डला एन्रीच नॉर्किएने ६ धावांवर त्रिफळाचीत केले. तर हार्दिक पंड्या १७ धावांवर १९ व्या षटकात आवेश खान विरुद्ध त्रिफळाचीत झाला. याच षटकात नॅथन कुल्टर नाईलला १ धावेवर आवेशने त्रिफळाचीत केले.
अखेरच्या षटकात जयंत यादवला आर अश्विनने ११ धावांवर बाद केले. अखेर कृणाल पंड्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत मुंबईला ८ बाद १२९ धावांपर्यंत पोहचवले. दिल्लीकडून आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी प्रेत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए आणि आर अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली. कृणाल १७ धावांवर नाबाद राहिला.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी दिल्लीने ११ जणांच्या संघात ललिल यादव ऐवजी पृथ्वी शॉला संधी दिली आहे. त्यामुळे शॉचे संघात पुनरागमन झाले आहे. तर मुंबईने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात जयंत यादवला राहुल चाहर ऐवजी संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एन्रिच नॉर्कीए