अबुधाबी। मंगळवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये डबल हेडरला थरार रंगला. या दिवशी दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. हा आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील त्यांचा पहिलाच विजय ठरला. या टप्प्यातील याआधीच्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.
या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १३५ धावा करत मुंबई समोर विजयासाठी १३६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने १९ षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला.
हार्दिक-तिवारीची महत्त्वपूर्ण खेळी
मुंबईकडून १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि क्विंटॉन डी कॉक सलामी फलंदाजीसाठी उतरले. मात्र, त्यांची जोडी फार काळ मैदानावर टिकली नाही. चौथ्या षटकात रवी बिश्नोईने रोहितला तिसऱ्या चेंडूवर ८ धावांवर, तर सूर्यकुमारला चौथ्या चेंडूवर शून्य धावेवर माघारी धाडले. त्यामुळे मुंबईला लागोपाठ २ धक्के बसले.
यानंतर डी कॉकने सौरभ तिवारीसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण डी कॉकला मोहम्मद शमीने १० व्या षटकात त्रिफळाचीत केले. तो २७ धावा करुन बाद झाला. त्यामुळे डी कॉक आणि तिवारीची ४५ धावांची भागीदारी तुटली. यानंतर तिवारीने हार्दिक पंड्याला साथीला घेत मुंबईचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. पण तिवारीला मोक्याच्या क्षणी १६ व्या षटकात नॅथन एलिसने ४५ धावांवर बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. त्याचा झेल यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला.
पण, त्यानंतर हार्दिक पंड्याने कायरन पोलार्डला साथीला घेत मुंबईला विजयाच्या दिशेने नेले. या दोघांनी काही आक्रमक फटके खेळताना मुंबईला १९ व्या षटकाखेर १३७ धावांवर पोहचवत विजय मिळवून दिला. हार्दिकने ३० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावांची खेळी केली. तर, पोलार्डने ७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १५ धावा केल्या.
मार्करम-हुडाची महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंजाब प्रथम फलंदाजीसाठी उतरले. त्याच्याकडून केएल राहुल आणि मनदीप सिंग यांनी चांगली सुरुवात केली होती. पण ६ व्या षटकात मनदीपला १५ धावांवर कृणाल पंड्याने पायचीत केले. त्यानंतर पंजाबच्या विकेट्सची मालिका सुरु झाली होती. ७ व्या षटकात कायरन पोलार्डने ख्रिस गेलला १ धावेवर, तर पंजाबचा कर्णधार केएल राहुलला २१ धावांवर बाद केले.
त्यानंतर ८ व्या षटकात निकोलस पूरन २ धावांवर जसप्रीत बुमराह विरुद्ध खेळताना पायचीत झाला. पण त्यानंतर एडेन मार्करम आणि दीपक हुडा यांनी पंजाबचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. अखेर १६ व्या षटकात मार्करमला ४२ धावांवर राहुल चाहरने त्रिफळाचीत केले. त्यामुळे मार्करम आणि हुडा यांची ६१ धावांची भागीदारी तुटली. यानंतर हुडा १९ व्या षटकात २८ धावांवर जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळताना कायरन पोलार्डकडे झेल देऊन बाद झाला.
अखेर हरप्रीत ब्रारने नाबाद १४ धावा आणि नॅथन एलिसने नाबाद ६ धावा करत पंजाबला २० षटकांत १३५ धावांपर्यंत पोहचवले.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी मुंबईने अंतिम ११ जणांच्या संघात २ बदल केले आहेत. त्यांनी इशान किशन ऐवजी सौरभ तिवारीला आणि ऍडम मिल्ने ऐवजी नॅथन कुल्टर नाईलला संधी दिली आहे.
त्याचबरोबर पंजाब किंग्सने अंतिम ११ जणांच्या संघात केवळ १ बदल केला आहे. मंयक अगरवालला पाठीचा त्रास होत असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी मनदीप सिंगला संधी देण्यात आली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
पंजाब किंग्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मनदीप सिंग, ख्रिस गेल, एडेन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट