ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्कला सोमवारी (८ जून) ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल. त्यामुळे तो आता हा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या ऍलन बॉर्डर आणि स्टिव्ह वॉ यांसारख्या कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे.
क्लार्कच्या (Michael Clarke) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने २०१५ विश्वचषक जिंकला होता. त्याची ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’च्या (Order of Austrlia) जनरल डिव्हिजनमध्ये अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. हा एक प्रकारचा सन्मान आहे. जो कोणत्याही यशासाठी किंवा सेवेसाठी दिला जातो.
या वृत्तावर प्रतिक्रिया देत क्लार्कने चॅनल९ बरोबर बोलताना सांगितले, “खरे सांगायचे झाले तर मला वाटले, की कोणीतरी मला जूनमध्ये एप्रिल फूल बनवित आहे. मी खूप आश्चर्यचकित झालो आहे. पण मला याचा खूप सन्मानही वाटत आहे.”
हा सन्मान मिळालेल्या इतर ऑस्ट्रेलियन कर्णधारांमध्ये बॉब सिम्पसन (Bob Simpson), बॉर्डर (Allan Border), मार्क टेलर (Mark Taylor), स्टीव्ह वॉ (Steve Waugh) आणि रिकी पाँन्टिंग (Ricky Ponting) यांचा समावेश आहे. क्लार्कला एक खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल हा सन्मान मिळाला आहे.
या ३९ वर्षीय खेळाडूने २०१५ विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने ११५ कसोटी सामन्यात ८६४३ धावा, २४५ वनडेत ७९८१ धावा, आणि ३४ टी२० सामन्यात ४८८ धावा केल्या आहेत.