इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन हा भारतीय क्रिकेट संघाबद्दल नेहमी कठोर वक्तव्य करण्यासाठी ओळखला जातो. पण टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी खेळवल्या गेलेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारतीय संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्याबद्दल मायकल वॉनही खूप खूश आहे.
भारताने १८ ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियालाही पराभूत केले. केएल राहुल, रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी भारतासाठी चांगल्या धावा केल्या. याशिवाय आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने गोलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे.
सराव सामन्यात भारतीय संघाने ज्या प्रकारे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला, ते पाहून क्रिकेट वर्तुळात भारतीय संघाचे खूप कौतुक केले जात आहे. मायकल वॉननेही भारतीय संघाचे कौतुक केले आहे. त्याने कोहलीच्या संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणत वर्णन केले आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मायकेल वॉनने एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘भारतीय संघाने ज्या प्रकारे सराव सामने खेळले आहे ते पाहता, भारतीय संघ आता टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार दिसत आहे.’
यापूर्वी वॉनने भारताला टी२० विश्वचषकासाठी दावेदार म्हणण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण आता, त्याने त्याचे सूर बदलत भारताला प्रबळ दावेदार म्हटले आहे.
The way India are playing the warm up games suggests they may be now Hot favourites to Win the #T20WorldCup !!!
— Michael Vaughan (@MichaelVaughan) October 20, 2021
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजी करताना ४१ चेंडूत ६० धावा केल्या. तर केएल राहुलने ३१ चेंडूत ३९ धावांची आकर्षक खेळी खेळली. याशिवाय सूर्यकुमार यादवनेही २७ चेंडूत ३८ धावा केल्या, या खेळाडूंच्या खेळ्या त्यांचा फॉर्म उत्कृष्ट असल्याचे दर्शवतात. याशिवाय अश्विनने गोलंदाजीत चांगली कामगिरी करत दोन षटकांत ८ धावा देऊन दोन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना जिंकण्यासाठी भारताला १५३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. फलंदाजीला उतरल्यावर भारतीय संघाने शानदार सुरुवात केली. भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. त्यानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने १७.५ षटकांत लक्ष्य गाठले. सराव सामन्यांमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय होता.
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
स्कॉटलंडची भरारी! ओमानला पराभूत करत साधली विजयाची हॅट्रिक; सुपर १२ मध्येही मिळवले स्थान
विराटची गोलंदाजी अन् स्मिथची बॅटिंग! ११ वर्षांनी सराव सामन्यादरम्यान घडला खास योगायोग
विराटला गोलंदाजी करताना पाहून स्मिथही फुटले हसू, गमतीने केली गोलंदाजीची नक्कल; पाहा व्हिडिओ