ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (२ फेब्रुवारी) आपला नियोजित दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर ताशेरे ओढले आहेत. हा दौरा भारताविरुद्धचा असता तर तुम्ही रद्द करण्याचा दम दाखवला असता का?, असा प्रश्न वॉनने विचारला.
तुम्ही भारताचा दौरा रद्द केला असता का?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार राहिलेल्या वॉनने आक्रमक प्रतिक्रिया दिली. तो ट्विट करत म्हणाला, “ही खेळासाठी अतिशय चिंताजनक बाब आहे. हा भारताविरुद्धचा दौरा असता तर तुम्ही असे केले असते का? मला वाटते, या कठीण प्रसंगी बिग थ्रींनी (भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड) जे काही करता येईल ते केले पाहिजे. इतर बोर्डांना यातून मदत होईल.”
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दर्शवली नाराजी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अचानकपणे दौरा रद्द केल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली होती. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक ग्रॅमी स्मिथ याने प्रतिक्रिया देत म्हटले, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाने आम्ही खूप नाराज झालो आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागणी केलेली प्रत्येक सोय आम्ही त्यांना देण्यासाठी तयार होतो. मालिकेसाठीची तयारी जोरदार सुरू होती. मात्र, अचानकपणे हा निर्णय झाला.”
दौऱ्यासाठी झाली होती संघनिवड
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ मार्च महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये तीन कसोटी सामने खेळले जाणार होते. काही दिवसांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी टीम पेनच्या नेतृत्वाखालील १९ जणांचा संघ घोषित केला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची दुसरी लाट आल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लिश गोलंदाजांच्या मदतीला धावला हा दिग्गज, दिला मोलाचा सल्ला
सीएसकेला मिळाला नवा स्पॉन्सर?, इतक्या कोटींचा करार झाल्याची शक्यता
क्रिकेटच्या मैदानावर कोरोनाचे पुनरागमन, राष्ट्रीय प्रशिक्षकाला घेतले विळख्यात