---Advertisement---

अजब इतिहास! कर्णधाराने शुन्यावर डाव घोषीत करुनही संघाला मिळवून दिला होता विजय

On: शनिवार, ऑगस्ट 8, 2020 11:47 AM
---Advertisement---

माइक ब्रेअर्ली हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान कर्णधार मानले जातात. ३१ कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना आपल्या डावपेचांनी, इंग्लंड संघांला १९७७-१९८१ या काळात, ३१ पैकी १८ सामन्यात विजय मिळवून दिले. ब्रेअर्ली यांच्या नेतृत्वात इंग्लंडने केवळ चार सामने गमावले. कर्णधार म्हणून त्यांच्या जय-पराजयाचे गुणोत्तर ४.५ असे राहिले. त्यांच्यापुढे फक्त, सर डोनाल्ड ब्रॅडमन ५.० आणि स्टीव्ह वॉ ४.५५ हे दोघेच आहेत. १९७६-७७ ​​च्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत मिडलसेक्स संघाने ब्रेअर्ली यांच्या रणनीतीमुळे विजेतेपद राखले होते.

६ ऑगस्ट १९७६ या दिवशी लॉर्ड्सवर मिडलसेक्स विरुद्ध सरे अशी ‘लंडन डर्बी’ रंगणार होती. पावसामुळे पहिल्या दिवशी थोडाही खेळ झाला नाही. दुसर्‍या दिवशी रविवार होता. त्यावेळी, रविवार ‘जॉन प्लेअर लीग’ (ज्याला संडे लीग देखील म्हटले जात) साठी राखीव ठेवण्यात येते. सरेने संडे लीगमध्ये लेसेस्टरशायरचा सामना केला. परंतु लेसेस्टरने त्यांचा ९ गड्यांनी पराभव केला. मिडलसेक्सने त्याच ठिकाणी यॉर्कशायर विरुद्ध सामना खेळला. परंतु, हा सामना अनिर्णित राहिला.

मिडलसेक्स – सरे सामना सोमवारी पुन्हा सुरू होणार होता पण, रात्रीच्या पावसामुळे खेळ दुपारच्या जेवणापूर्वी सुरु करता येणार नव्हता. अखेर, दुसऱ्या सत्रात खेळ सुरू होताच यजमान संघाचा कर्णधार ब्रेअर्ली यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. २३ मिनिटांच्या खेळ झाला असता, खराब सूर्यप्रकाश आणि पाऊस पडल्याने खेळ पुन्हा थांबला. सरेने पाच षटकांत १ बाद ८ धावा केल्या होत्या. खेळ झालेली, २३ मिनिटे खूप महत्त्वाची ठरली. काउंटीच्या नियमांनुसार, तीनदिवसीय सामन्यातील दोन दिवस वाया गेले तर तो सामना एकदिवसीय होतो व दोन्ही संघांना प्रत्येकी एक डाव मिळतो. पण, दुसऱ्या दिवशीच्या त्या २३ मिनिटाच्या खेळामुळे अजूनही सामन्यात दोन्ही संघ दोन-दोन डाव खेळू शकत होते.

सामन्याच्या विजेत्याला १२ गुण मिळत. पण, दोन दिवसांचा खेळ वाया गेल्याने, दोन्ही संघांना दोन-दोन डाव मिळतील याबाबत सर्वांना शंका होती. त्याचप्रमाणे, कोणताही एक संघ विजयी होण्याची शक्यता खूप कमी होती. ब्रेअर्ली यांना चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील आपल्या संघाची स्थिती आणि स्पर्धेच्या नियमांची चांगली माहिती होती. शेवटच्या दिवशीचे वातावरण चांगले होते. परंतु, खेळपट्टी हिरवी व ओलसर होती. वेन डॅनियल आणि माईक सेलवे यांनी एकत्रितपणे आठ गडी बाद करत, २२.५ षटकांत अवघ्या ४९ धावांवर सरेचा डाव गुंडाळला. ५० धावांच्या आत विरोधी संघाला बाद केल्याने चार बोनस गुण मिडलसेक्सला मिळाले.

मिडिलसेक्सने सलामीवीर म्हणून फिरकीपटू जॉन एम्ब्यूरी आणि यष्टीरक्षक इयान गोल्ड यांना बढती दिली. सरेचा कर्णधार रॉबिन जॅकमॅन यांनी पहिल्याच चेंडूवर एम्ब्युरी यांच्याविरुद्ध पायचीतचे अपील केले. दुसरा चेंडू टाकण्याआधीच, मिडलसेक्सचे कर्णधार माइक ब्रेअर्ली यांनी ०.१ षटकांनंतर ०-० धावसंख्येवर आपल्या संघाचा डाव घोषित केला. ब्रेअर्ली यांना आपल्या गोलंदाजांवर विश्वास होता. गोलंदाज सरेला पुन्हा एकदा लवकरात लवकर बाद करतील याची ब्रेअर्ली यांना खात्री होती. डॅनियल आणि सेलवे यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत,‌ पुन्हा एकत्रितपणे सात गडी टिपले. सरेचा दुसरा डाव ८९ धावात गडगडला.

यजमानांना विजयासाठी १३९ धावा बनवायच्या होत्या पण त्यासाठी वेळ खूप कमी शिल्लक होता. त्यांना राहिलेली २७ मिनिट व अधिकच्या २० षटकात या धावा करणे आवश्यक होते. कर्णधार ब्रेअर्ली यांनी मायकेल स्मिथबरोबर सलामी दिली आणि २७ मिनिटांच्या खेळात सात षटकांत ४७ धावांची भागीदारी केली. मिडिलसेक्सला २० षटकांत आणखी ९२ धावांची आवश्यकता होती. सरे संघ त्यांचा वेगवान गोलंदाज जेफरी अर्नोल्डची सेवा घेऊ शकत नव्हता. जेफरी पायाच्या पायाच्या दुखापतीमुळे मैदानात उतरले नव्हते.

कर्णधारासह १०१ धावांची सलामी भागीदारी करुन स्मिथ ५१ धावांवर बाद झाले. सामना संपायला ११ चेंडू बाकी असताना, ब्रेअर्ली यांनी नाबाद ६६ धावा करून, क्लाईव्ह रॅडली यांच्यासह सामना संपविला. काउंटी चॅम्पियनशिपचा गतविजेता असलेला, मिडलसेक्स या सामन्याच्या सुरूवातीस अग्रभागी असलेल्या केंटपेक्षा दोन गुणांनी मागे होता. चॅम्पियनशिपच्या शेवटी, दोन्ही संघांनी २२७ अशी बरोबरी साधली. १९७६-७७ या मोसमाचे संयुक्त विजेते म्हणून केंट व मिडलसेक्स यांना घोषित केले गेले. सरे विरुद्ध ब्रेअर्ली यांच्या ‘चाणक्यनीति’ द्वारे मिळवलेले अतिरिक्त गुण मिडलसेक्ससाठी निर्णायक ठरले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---