इंडियन प्रीमियर लीगचा थरार येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ९ एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमने सामने असणार आहेत. आरसीबी संघात एबी डीवीलियर्स आणि विराट कोहली सारखे स्टार फलंदाज आहेत. तसेच माईक हेसन यांनी आयपीएल २०२१ साठी निवड झालेल्या ३ अनकॅप खेळाडूंची निवड केली आहे. जे येणाऱ्या हंगामात आरसीबी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.
१) मोहम्मद अजहरुद्दीन : आयपीएल २०२१ हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात आरसीबी संघाने मोहम्मद अजहरुद्दीन याला २० लाखाच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. मोहम्मद अजहरुद्दीनने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ताबडतोड शतकी खेळी केली होती. त्याने मुंबई संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ११ षटकारांचा मदतीने अवघ्या ५४ चेंडूत १३७ धावांची खेळी केली होती.
या खेळाडूबद्दल बोलताना माईक हेसन म्हणाले, “तो उत्कृष्ट खेळाडू आहे, सैयद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई संघाविरुद्ध शतक झळकावून तो चर्चेत आला. जेव्हा तो टेलिव्हिजनवर आला होता तेव्हा प्रत्येकाने पाहिले होते की, तो काय करू शकतो.”
२) सुयश प्रभुदेसाई : सुयशबद्दल बोलताना माईक हेसन म्हणाले, “या फलंदाजाकडे प्रत्येक प्रकारचे शॉट खेळण्याची क्षमता आहे. तो चौफेर फटकेबाजी करू शकतो. तसेच तो एक चांगला ॲथलिट देखील आहे. तसेच तो आमच्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो. हा ताकदवर खेळाडू आरसीबी संघासाठी येणाऱ्या हंगामात चांगली कामगिरी करू शकतो.”
३) रजत पाटीदार: रजतबद्दल बोलताना माईक हेसन म्हणाले, “रजतची ही पहिली आयपीएल स्पर्धा आहे. तो २७ वर्षाचा आहे आणि त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटची चांगली जाण आहे. तो एक उच्च दर्जाचा फलंदाज आहे. त्याने सैयद मुश्ताक अली टी २० स्पर्धा आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. आम्ही त्याला गेल्या २ वर्षांपासून खेळताना पाहत आहोत.”
देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये मध्यप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रजतने, सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत अवघ्या ५१ चेंडूत ९६ धावांची खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने आणखी एक महत्त्वाची खेळी केली होती. त्याने अवघ्या २९ चेंडूत ६८ धावा चोपल्या होत्या. हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये येऊन तो संघासाठी महत्वपूर्ण धावा करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्यरच्या खांद्याची पुढील आठवड्यात होणार सर्जरी, आयपीएलसह ‘या’ मोठ्या स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता
क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिराती, ज्या तुम्हाला आठवण करुन देतात तुमचं बालपण
आहा! संजना गणेशनच्या सुंदर फोटोने वाढवला नेटचा पारा, बुमराहने दिली ‘अशी’ रिऍक्शन






