भारत देशात सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गोरगरिबांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीपर्यंत कोणीही या महामीराच्या तावडीतून सुटलेले नाही. नुकतेच भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग हेदेखील या महामारीचे शिकार बनले आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. ते निधनसमयी ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
काही दिवसांपुर्वी राहते घर चंदीगडमध्ये मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले होते. परंतु पुढे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आणि त्यांनी जेवण करणेही कमी केल्याने त्यांना २४ मे रोजी मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात हालवण्यात आले होते. याबद्दल त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खा सिंग यांनी माहिती दिली होती.
त्यांनतर जवळपास महिनाभर ते या आजाराशी झुंज देत होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालावली. अखेर रात्री ११.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
Legendary Indian sprinter Milkha Singh dies after month long battle with COVID-19: Family spokesperson
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2021
In the passing away of Shri Milkha Singh Ji, we have lost a colossal sportsperson, who captured the nation’s imagination and had a special place in the hearts of countless Indians. His inspiring personality endeared himself to millions. Anguished by his passing away. pic.twitter.com/h99RNbXI28
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
पाकिस्तानमध्ये झाला होता जन्म
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर,१९२९ मध्ये गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. काही वर्ष देशासाठी कर्तव्य बजावल्यानंतर त्यांनी क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला होता.या शर्यतीत तब्बल ४०० अधिकारी एकसोबत धावले होते.ज्यामध्ये मिल्खा सिंग हे सहाव्या क्रमांकांवर आले होते.
‘फ्लाइंग सिख’ म्हणून होते प्रसिद्ध
मिल्खा सिंग यांनी आपल्या धावण्याच्या विलक्षण शैलीने जगभर भारताला पदके मिळवून दिली आणि ‘फ्लाइंग सिख’ ही उपाधी मिळवली. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी त्यांना हा खिताब दिला होता. मिल्खा सिंग यांनी १९५६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. परंतु त्यांना या स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु १९५८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी २०० आणि ४०० मीटरच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यांचे यश पाहून, भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.