---Advertisement---

मीराबाई चानूने Asian Games मध्ये जिंकले रौप्य, भारताची वेटलिफ्टिंगमधील 28 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात!

On: बुधवार, सप्टेंबर 23, 2026 12:46 PM
---Advertisement---

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूचे आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. तिने बुधवारी (23 सप्टेंबर) ऐची आणि नागोया येथे सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

मीराबाईने या स्पर्धेत एकूण 198 किलो वजन उचलले, ज्यामध्ये ‘स्नॅच’ प्रकारात 87 किलो आणि ‘क्लीन अँड जर्क’ (C&J) प्रकारात 111 किलो वजनाचा समावेश होता. या प्रकारात सुवर्ण पदक उत्तर कोरियाच्या री सॉन्ग गम हिने जिंकले. तिने 215 किलो वजन उचलले, तर इंडोनेशियाची लुलुक डायना त्रि विजयाना कांस्य पदकाची मानकरी ठरली.

मीराबाईचे हे पदक खास आहे, कारण या पदकाने भारताची 28 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 1951 पासून या स्पर्धेची सुरूवात झाल्यापासून भारताने वेटलिफ्टिंगमध्ये 15 पदकांची कमाई केली होती. यामध्ये पाच रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे.

1998 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमधील भारताचे मीराबाईने जिंकलेले पहिले पदक आले आहे.

मीराबाईला 2023 मध्ये पदकाने हुलकावणी दिली होती. त्यावेळी मांडीची दुखापत असतानाही तिने सहभाग घेतला आणि 117 किलो वजन उचलण्याच्या क्लीन ऍंड जर्क प्रयत्नावेळी कोसळली आणि कांस्य पदक जिंकण्यापासून 8 किलोने कमी पडत चौथ्या स्थानावर राहिली होता. यंदा तिची स्वप्नपूर्ती झाली आहे.

त्याचबरोबर मीराबाईच्या लक्षवेधी कारकिर्दीमध्ये आणखी एका पदकाची भर झाली आहे. तिने याआधी ऑलिम्पिकसह अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली होती.

मीराबाईने 2020 ऑलिम्पिकमध्ये रौप्य, जागतिक चॅम्पियनशीपचे तीन (2017 सुवर्ण, 2022 रौप्य, 2025 रौप्य), आशियाई चॅम्पियनशीप (2020 कांस्य), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (2018 सुवर्ण, 2022 सुवर्ण, 2026 सुवर्ण, 2014 रौप्य), राष्ट्रमंडळ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे चार सुवर्ण आणि एका रौप्य पदक अशी कामगिरी केली आहे. (Mirabai Chanu wins silver at Asian Games 2026; India’s 28-year wait in weightlifting ends)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---