भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये एकमेव दिवस रात्र कसोटी सामना पार पडला. या ऐतिहासिक सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. ज्यामुळे हा सामना अनिर्णित झाला. या सामन्यानंतर भारतीय कसोटी संघाची कर्णधार मिताली राजने ‘कॅप्टन कुल’ एमएस धोनीकडून एक खास गोष्ट शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या ऐतिहासिक सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली होती. हा सामना झाल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने एमएस धोनी कडून नाणेफेक जिंकण्याचे कौशल्य शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मिताली राजने आतापर्यंत एकूण १८३ आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान १८३ सामन्यांपैकी ८४ सामन्यात तिला नाणेफेक जिंकण्यात यश आले आहे.
मिताली राजने खुलासा केला की, नाणेफेक गमावल्यानंतर संघातील खेळाडू तिची पायखेची करत असतात. सामना झाल्यानंतर जेव्हा तिला पत्रकार परिषदेत नाणेफेकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने म्हटले की, “हा वारसा बनू नये, अशी माझी इच्छा आहे. संघातील खेळाडू नाणेफेकीमुळे माझी पायखेची करत असतात. त्यामुळे मला वाटले की मी नाणेफेक संबंधित माझा निर्णय बदलला पाहिजे. पण काहीच उपयोग झाला नाही. म्हणूनच मला वाटते की, मला धोनीकडून नाणेफेकीचे कौशल्य शिकण्याची गरज आहे.”
Talk about taking a cue from @msdhoni to win the toss 🙂🙂#TeamIndia | @M_Raj03 | #AUSvIND pic.twitter.com/kFtDHeuItW
— BCCI Women (@BCCIWomen) October 3, 2021
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने पहिल्या डावात ७ बाद ३७७ धावा, तर दुसऱ्या डावात ३ बाद १३५ धावा करत डाव घोषित केला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ३२ षटकात २७२ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना १५ षटकात ३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही कर्णधारांनी मिळून हा सामना अनिर्णित करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ९ बाद २४१ धावा करत डाव घोषित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील आयपीएल हंगामात आरसीबीचा कर्णधार बनणार कोण? माजी भारतीय क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर
‘त्याची गती कमी झाली, पण…’, भुवनेश्वर कुमारबद्दल माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया