---Advertisement---

LSG vs PBKS: मिशेल मार्श संघाबाहेर! मात्र पंजाबसाठी सर्वात मोठा धोका त्यांचाच…

On: शनिवार, मे 23, 2026 4:34 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार, २३ मे) एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना खेळला जाणार आहे. या हंगामातून लखनऊ आधीच बाहेर झाला आहे, मात्र पंजाबला हा सामना जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी संधी आहे. तसेच पंजाबने हा सामना गमावला तर ते स्पर्धेबाहेर होणार आहेत. या सामन्याआधी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला एक आनंदाचे वृत्त मिळाले आहे.

लखनऊसाठी या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू पंजाब विरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. मिशेल मार्श या सामन्यासाठी उपलब्ध नाही, अशी माहिती समोर येत आहे. तो राष्ट्रीय कर्तव्यासाठी ऑस्ट्रेलिया संघासोबत जोडला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे मार्श पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. मार्शचे संघात नसणे पंजाबसाठी फायद्याचे आहे, मात्र त्यांना त्यांच्याच एका माजी खेळाडूकडून सावध राहावे लागण्याची आवश्यकता आहे.

जोश इंग्लिस हा मागील हंगामात पंजाबकडून खेळला होता, आता तो लखनऊच्या संघात असून त्याने आतापर्यंत चार सामने खेळताना १९४ धावा केल्या आहेत. यामुळे तो पंजाबसाठी धोका ठरण्याची शक्यता आहे.

या हंगामाची सुरूवात पंजाबने चांगली केली होती. ते आपल्या पहिल्या सात सामन्यांपर्यंत अपराजित राहिले होते, त्यानंतर मात्र सलग सहा सामने गमावल्याने ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आले आहेत. लखनऊची या हंगामात त्यांच्या घरच्या मैदानावरही चांगली कामगिरी झाली नाही, अशात ते हंगामाचा शेवट सकारात्मक करण्याचा प्रयत्नात असतील.

आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद प्लेऑफसाठी पात्र ठरले असून उर्वरित एका जागेसाठी चार संघांमध्ये चुरस सुरू आहे. त्यापैकी एक पंजाब असून बाकी तीन संघ राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आहेत. तसेच लखनऊप्रमाणे पाच वेळेचे विजेते संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचेही आव्हान संपले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---