भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 जानेवारी) लखनऊ येथे खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने एक चेंडू व 6 गडी राखून रोमांचक विजय मिळवला. भारताच्या विजयामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. मात्र, या सामन्यात फिरकीपटूंचे इतके वर्चस्व राहिले की, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन त्याला एक विचित्र ऑफर दिली होती.
लखनऊ येथील ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरली. कारण, येथे एकही फलंदाज खुलेपणाने खेळू शकला नाही. संपूर्ण सामन्यात टाकल्या गेलेल्या 239 चेंडूंपैकी 179 चेंडू फिरकीपटूंनी टाकले. भारताकडून 13 तर न्यूझीलंडकडून तब्बल 17 षटके फिरकीपटूंनी टाकली. विशेष म्हणजे न्यूझीलंडसाठी यष्टीरक्षकाची भूमिका बजावणाऱ्या ग्लेन फिलिप्स याने चार षटके ऑफ स्पिन गोलंदाजी केली.
फिरकीपटूंना मिळत असलेली हीच साथ लक्षात घेता, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला थेट फिरकी गोलंदाजी करणार का अशी विचारणा केली होती. सॅंटनरने सामन्यानंतर बोलताना म्हटले,
“मला अधिकाधिक गोलंदाजी फिरकीपटूंकडून करून घ्यायची होती. त्यामुळे मी लॉकीला ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यासाठी विचारले होते. मात्र, हे शक्य होऊ शकले नाही.”
नेहमी नव्या चेंडूने गोलंदाजी करणारा लॉकी फर्ग्युसनला या सामन्यात 19 व्या षटकात गोलंदाजीला आलेला. फर्ग्युसन हा 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
या सामन्याचा विचार केल्यास न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी बळी मिळवत न्यूझीलंडला 99 धावांवर रोखले. न्यूझीलंडसाठी कर्णधार सॅंटनरने सर्वाधिक 19 धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना भारत सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, सॅंटनरच्या कुशल नेतृत्वाने त्यांनी भारतीय संघाला अखेरच्या क्षणापर्यंत झुंजवले. सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनी चिवट फलंदाजी करताना संघाला एक चेंडू राखून विजय मिळवून दिला. नाबाद खेळी करणारा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.
(Mitchell Santner Offer Lockie Ferguson To Bowl Spin Bowling In Lucknow T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला क्रिकेटपटू पार्श्वीने पहिल्या प्रेमासाठी केला त्याग; क्रिकेटर नव्हे तर…
सेव्हन अ साईड फुटबॉल | कॉन्स्टलेशन चिताज संघाला दोन गटात विजेतेपद; मार्व्हल्स, स्ट्रायकर्स, पॅंथर्स अन्य गटात विजेते