ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये चेंडूने उत्तम कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनल 2025च्या पहिल्याच दिवशी 2 विकेट्स घेत स्टार्क आयसीसी टूर्नामेंट फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने भारताचा धडाकेबाज गोलंदाज मोहम्मद शमीचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर संपल्यानंतर, जेव्हा दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली तेव्हा कोणीही विचार केला नसेल की मिचेल स्टार्क पहिल्याच षटकात विकेट्स घेण्याचा चमत्कार करेल.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीची सुरुवात करताना मिचेल स्टार्कने पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर एडेन मार्करामला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मार्करामला त्याचे खातेही उघडता आले नाही. त्यानंतर काही वेळातच स्टार्कने सलामीवीर रायन रिकलटनलाही आपला बळी बनवले. स्टार्कने त्याच्या पाचव्या षटकात 16धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर रिकलटनला बाद केले. अशाप्रकारे, स्टार्क आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
आतापर्यंत, आयसीसी टूर्नामेंट (डब्ल्यूटीसी, एकदिवसीय विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर होता. परंतु स्टार्कने त्याला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने 2025च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 2महत्त्वाच्या विकेट्स घेऊन हे स्थान मिळवले. शमीने आयसीसी फायनलमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. आता मिचेलने आयसीसी फायनलमध्ये 11 विकेट्स घेण्याचा महान पराक्रम केला आहे.
आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
मिशेल स्टार्क – 11 विकेट्स (6 डाव)
मोहम्मद शमी – 10 विकेट्स (6 डाव)
ट्रेंट बोल्ट – 8 विकेट्स (5 डाव)
रवींद्र जडेजा – 8 विकेट्स (10 डाव)
काइल जेमिसन – 8 विकेट्स (3 डाव)
ग्लेन मॅकग्रा – 8 विकेट्स (5 डाव)
जर आपण मिशेल स्टार्कच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 97 कसोटी सामन्यांपैकी 185 डावात 384 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये पंधरा फाईव्ह विकेट हाॅळ घेण्याचाही समावेश आहे. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 46 कसोटी सामन्यांमध्ये 173 विकेट्स घेतल्या आहेत.





