दुबई येथे सातव्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांदरम्यान खेळला गेला. या महत्त्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत न्यूझीलंडचा डाव १७२ धावांवर रोखला. त्याच वेळी या सामन्यात पहिला चेंडू टाकताना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने व तो चेंडू खेळताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल याने एक नवा विक्रम रचला.
स्टार्क आणि गप्टिलचा नवा कारनामा
या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडसाठी अनुभवी मार्टिन गप्टिल व डेरिल मिशेल यांनी डावाची सुरुवात केली. तर ऑस्ट्रेलियासाठी पहिले षटक अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने टाकले.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पहिला चेंडू खेळण्याचे भाग्य मार्टिन गप्टिल याला लाभले. या पहिल्याच चेंडूवर एकही धाव निघाली नाही. मात्र, याबरोबरच स्टार्क व गप्टिल यांनी एक नवा कारनामा आपल्या नावे केला. टी२० व वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पहिला एकाच खेळाडूने टाकण्याचा व एकाच खेळाडूने खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१५ वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्टार्क याने गोलंदाजीची सुरुवात करत पहिला चेंडू गप्टिलला टाकला होता. विशेष म्हणजे त्यावेळी ही पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नव्हती.
न्यूझीलंडची सन्मानजनक धावसंख्या
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मिशेल लवकर बाद झाल्यानंतर गप्टिलने ३५ चेंडूत २४ धावांची संथ खेळी केली. मात्र, कर्णधार केन विलियम्सनने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरत ४८ चेंडूवर ८५ धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात ४ बळी गमावून १७२ धावा धावफलकावर लावल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रशिक्षक द्रविडची अनोखी शैली! काम सुरू करण्यापूर्वी खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधत केली ‘ही’ चर्चा
केनचा आणखी एक कारनामा! लाजवाब अर्धशतकासह बनविला नवा इतिहास