युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे अ गटातील संघ आमने सामने येणार आहेत. आपला पहिला सामना जिंकल्यानंतर हे दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला एक जबर धक्का बसला असून, त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.
हा खेळाडू झाला दुखापतग्रस्त
दुबई येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ सराव करताना दिसून आला. परंतु, संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा काहीसा लंगडताना दिसला. त्यानंतर त्याने सरावातून माघार घेतली. ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाकडून याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नसली तरी, अत्याधिक जोखमीचा भाग म्हणून त्याला या सामन्यातून विश्रांती देण्यात येऊ शकते.
पहिल्या सामन्यात केली होती शानदार कामगिरी
मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आपल्या चार षटकांत ३२ धावा देऊन २ बळी मिळवले होते. त्याने आतापर्यंत आपल्या टी२० कारकिर्दीत ३२ सामने खेळताना ५३ बळी मिळवले आहेत. स्टार्क या सामन्यात खेळू न शकल्यास पॅट कमिन्स व जोश हेजलवूड यांच्यासह नॅथन एलिस अथवा केन रिचर्डसनचा अंतिम अकरामध्ये समावेश केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त बदल म्हणून फिरकीपटू ऍश्टन एगर याला देखील संधी मिळू शकते.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अॉस्ट्रेलियाचा संभाव्य संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, ऍडम झंपा व नॅथन एलिस/ केन रिचर्डसन
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया-श्रीलंका संघांमध्ये कोणाची कामगिरी सरस? कशी असेल उभयंताची प्लेइंग इलेव्हन? वाचा सर्वकाही
नामबिया संघाची गुणतालिकेत मोठी उडी, भारत अन् न्यूझीलंडला पछाडत टॉप-३ मध्ये धडक