भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात रविवारी (१४ मार्च) लखनऊ येथे चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेटपटूंनी प्रतिस्पर्धींची पुरती दैना करुन सोडली. दरम्यान भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने वनडेतील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
डावातील १६ व्या षटकातपर्यंत भारतीय संघ २ बाद ६१ धावांवर होता. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मितालीने डावास चालना दिली. तिने ७१ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४५ धावा चोपल्या. अखेर ३७.१ षटकात दक्षिण आफ्रिकाच्या तुमी सेखुखुनेने शबनिम इस्माइलच्या हातून तिला झेलबाद केले.
भलेही ५ धावांनी मितालीचे अर्धशतक हुकले, परंतु या छोटेखानी खेळीसह तिने वनडेतील ७००० धावांचा टप्पा पार केला आहे. १९९९ ते २०२१ दरम्यान २१३ वनडे सामने खेळताना मितालीने ७०१९ धावा केल्या आहेत. यात तिच्या ७ शतकांचा आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह मिताली वनडेत सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
याबाबतीत इंग्लंडची फलंदाज शार्लेट एडवर्ड्स दुसऱ्यास्थानी आहे. तिने १९१ वनडे सामन्यात ५९९२ धावा केल्या आहेत. तर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेलिंडा क्लर्क ४८४४ धावांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू
७०१९ धावा- मिताली राज
५९९२ धावा- शार्लेट एडवर्ड्स
४८४४ धावा- बेलिंडा क्लर्क
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! विजय हजारे ट्रॉफी फायनलमध्ये पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, उचलून नेलं मैदानाबाहेर
“आज चक्रवर्ती संघाबाहेर झालाय, कुणास ठाऊक कधी रोहित-पंत फिटनेस टेस्टमध्ये फेल होतील”
हे काय नवीनच! ‘थाला’ने घेतला संन्यास? बौद्ध भिक्षू अवतारातील फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ