भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात शुक्रवारी (१२ मार्च) तिसरा वनडे सामना पार पडला. लखनऊ येथे झालेला हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाहुणे झगडताना दिसले. तर यजमानांनी विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने मोठा किर्तीमान आपल्या नावे केला.
नाणेफेकीचा निकाल दक्षिण आफ्रिका संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजी निवडली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या १२ षटकांनतर संघाने २ बाद ६४ धावा फलकावर नोंदवल्या होत्या. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मितालीने ३६ धावा चोपल्या. या खेळीसाठी तिने ५० चेंडू खेळले आणि ५ चौकार मारले.
या छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळीसह मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १०००० धावांचा टप्पा पार केला. आजवर वनडे क्रिकेटमध्ये तिने २१२ सामने खेळताना ५०.६४ च्या सरासरीने ६९७४ धावा केल्या आहेत. तर ८९ टी२० सामन्यात २३६४ धावा आणि १० कसोटी सामन्यात ६६३ धावा नोंदवल्या आहेत. अशाप्रकारे तिन्ही स्वरुपात मिळून तिने एकूण १०००१ धावा कुटल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा आकडा गाठणारी मिताली जगातील दुसरी आणि भारतातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याबाबतीत तिने सुझी बेट्स आणि स्टिफनी टेलर यांना पिछाडीवर टाकले आहे. न्यूझीलंडची क्रिकेटपटू सूझी बेट्स ७८४९ धावांसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर वेस्ट इंडिजची क्रिकेटपटू स्टेफनी टेलर ७८१६ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडची फलंदाज शार्लेट एडवर्ड्स ही अव्वलस्थानी विराजमान आहे. तिने मितालीपेक्षा २७२ धावा जास्त करत अव्वलस्थानावर ताबा मिळवला आहे.
What a champion cricketer! 👏👏
First Indian woman batter to score 10K international runs. 🔝 👍
Take a bow, @M_Raj03! 🙌🙌@Paytm #INDWvSAW #TeamIndia pic.twitter.com/6qWvYOY9gC
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2021
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू-
शार्लेट एडवर्ड्स: १०२७३ धावा
मिताली राज: १०००१ धावा
सूझी बेट्स: ७८४९ धावा
स्टेफनी टेलर: ७८१६ धावा
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० मालिका: पाहुण्यांना चारणार पराभवाची धूळ! ‘या’ भारतीय शिलेदारांवर असेल सर्वांची नजर
INDvsENG: टीम इंडिया जरा जपूनच, ‘हे’ इंग्लिश खेळाडू एकहाती पलटू शकतात सामना