हॅमिल्टन। न्यूझीलंड महिला विरुद्ध भारत महिला संघात आज (1 फेब्रुवारी) तिसरा वनडे सामना पार पडला. यामध्ये भारताला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. याआधी भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत 3 सामन्यांची वन-डे मालिका 2-0नेच जिंकली होती.
आजचा सामना भारतीय कर्णधार मिताली राजचा 200वा वन-डे सामना ठरला आहे. हा विक्रम करणारी ती जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रम तिने 192वा सामना खेळतानाच मोडला होता. तिच्याआधी इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्सच्या नावावर हा विक्रम होता. तिने 191 वन-डे सामने खेळले आहेत.
मितालीने 1999मध्ये आयर्लंड विरुद्ध वन-डेमध्ये पदार्पण करताना नाबाद 114 धावा केल्या होत्या. आत्तापर्यंत तिने 200वनडे सामन्यांत 51.33च्या सरासरीने 6622 धावा केल्या आहेत. यात तिने 7 शतके आणि 52 अर्धशतके केली आहेत.
आजच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारताच्या सलामीवीर जेमिमा रोड्रीगेज (12) आणि स्म्रीती मंधाना (1) लवकरच बाद झाल्या.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मितालीला काही खास कामगिरी करता आली नाही. यावेळी ती फक्त 9धावाच करू शकली. दिप्ती शर्माने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 150 धावांचे लक्ष ठेवले होते.
सर्वाधिक वन-डे सामने खेळणाऱ्या महिला खेळाडू-
200 सामने – मिताली राज (भारत)
191 सामने – चार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)
174 सामने – झुलन गोस्वामी (भारत)
144 सामने – एलेक्स ब्लॅकवेल (ऑस्ट्रेलिया)
143 सामने – जेनी गन (इंग्लंड)
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय रेल्वे संघाने जिंकले ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद
–हे भारतीय खेळाडू त्यांच्या २००व्या वन-डे सामन्यात ठरले आहेत यशस्वी
–पदार्पणाच्या सामन्यातच शुबमन गिलने विराट कोहलीला टाकले मागे