क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहेत. तसेच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असेही म्हटले जाते. याचाच प्रत्यय गुरुवारी वरिष्ठ महिला टी20 लीगमध्ये आला आहे.
या स्पर्धेत गुरुवारी मिझोरम विरुद्ध मध्यप्रदेश संघात सामना पार पडला. या सामन्यात मिझोरम संघाचा डाव फक्त 9 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेली अपूर्वा भारद्वाज फक्त धावांचे खाते उघडू शकली. तिने 25 चेंडूत 6 धावा केल्या.
तर अन्य एकाही फलंदाजाला एक धावही करता आली नाही. मिझोरमचे तब्बल 9 फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाले. तसेच तेतेई ही शून्य धावेवर नाबाद राहिली. मिझोरमला 2 वाईडचे आणि 1 लेग बाईजची धाव अशा 3 धावा ज्यादा मिळाल्या. त्यामुळे त्यांची धावसंख्या 13.5 षटकात सर्वबाद 9 धावा अशी झाली.
मध्यप्रदेशकडून तरंग झाने सर्वात प्रभावशाली गोलंदाजी केली. तिने 4 षटकात तब्बल 23 निर्धाव चेंडू टाकले आणि फक्त 2 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर अन्य गोलंदाजांपैकी सलोनी डांगोरेने 2 आणि अंशुला राव, कर्णधार वर्षा चौधरी, निधी बुली आणि बबिता मंडलिकने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मध्येप्रदेश संघाने चमकदार गोलंदाजीनंतर 10 धावांचे आव्हान पहिल्याच षटकात एकही विकेट न गमावता सहज पूर्ण केले. या पहिल्या षटकात मिझोरमच्या अपूर्वा भारद्वाजने गोलंदाजी केली. तिने गोलंदाजी करताना 5 चेंडू वाईड टाकत मध्यप्रदेशचा विजय आणखी सोपा केला होता.
मिझोरमचा या स्पर्धेतील ही दुसरी खराब कामगिरी आहे. याआधी 20 फेब्रुवारीला झालेल्या केरळ विरुद्धच्या सामन्यातही मिझोरमचा डाव 24 धावांवर संपूष्टात आला होता. या सामन्यातही त्यांना 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.
यावर्षीच्या सुरुवातीला एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात चीनचा महिला संघ युएई महिला संघाविरुद्ध 14 धावांवर सर्वबाद झाला होता. ही महिला आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी
–आयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट
–पहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ