पुणे, २१ डिसेंबर २०२३: पीसीएमसी अकादमी, जीएसटी कस्टम पुणे, मध्य रेल्वे पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी दिमाखदार विजय नोंदवत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक मारली.
ही स्पर्धा धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने आयोजित केली आहे. पीसीएमसी अकादमी संघाने एकतर्फी झालेल्या लढतीत हॉकी लव्हर्स क्लबचा ८-१ असा धुव्वा उडविला. त्यावेळी त्यांच्याकडून जय काळे व हर्षदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले तर अभिषेक माने, सौरभ पाटील, अक्षय जाधव, विक्रम पिल्ले यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. पराभूत संघाकडून निहाल गोरटकर याने एकमेव गोल नोंदविला. मध्यंतराला पीसीएमसी संघाने २-० अशी आघाडी घेतली होती.
जीएसटी संघाने उत्कंठा पूर्ण झालेल्या लढतीत इन्कम टॅक्स संघाला टायब्रेकरद्वारा ४-२ असे पराभूत केले पूर्ण वेळेत हा सामना २-२ असा बरोबरीत राहिला होता. पूर्णवेळ त्यांच्याकडून स्टीफन स्वामी व बी. फेलिक्स यांनी प्रत्येकी एक गोल केला तर टायब्रेकर मध्ये तालेब शेख, बी फेलिक्स, सतीश पॉल व स्टीफन स्वामी यांनी गोल नोंदवले. इन्कम टॅक्स संघाकडून विक्रम सिंग याने पूर्णवेळेत दोन गोल केले तर टायब्रेकर मध्ये गुरुमुख सिंग व चिराग माने हे दोनच खेळाडू गोल करू शकले.
मध्य रेल्वे संघाने राज्य राखीव पोलीस दल (एस आर पी एफ) यांचा ८-० असा दणदणीत पराभव केला त्याचे श्रेय आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज वाल्मिकी याने नोंदवलेल्या दोन गोलांना द्यायला लागेल त्याला रूबेन केदारी, विनीत कांबळे, गणेश पाटील, भूषण ढेरे, डी.श्रेयस, विशाल पिल्ले यांनी प्रत्येकी एक गोल करीत चांगली साथ दिली.
क्रीडा प्रबोधिनी संघाने अटीतटीने झालेल्या लढतीत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर ३-२ असा विजय मिळविला. मध्यंतराला १-१ असा गोल फलक होता क्रीडा प्रबोधिनी संघाकडून सागर शिंगाडे, प्रज्वल मोहरकर व विनायक हांडे यांनी प्रत्येकी एक गोल केला. फूड कॉर्पोरेशन संघाकडून भीम कुमार व तेजस चव्हाण यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. (MJ Cup. GST, PCMC Academy Semi Finals; Progress of Central Railway and Sports Prabodhini)
परिणाम
क्रीडा प्रबोधिनी: ३ (सागर शिंगाडे २५वे; प्रज्वल मोहरकर ५३वे; विनायक हांडे ५७वे) वि.वि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया : २ (भीमकुमार ५वे; तेजस चौहान ४८वे).
मध्य रेल्वे पुणे: ८ (रुबेन केदारी १३वे ; युवराज वाल्मिकी १३वे, १४वे; विनित कांबळे २९वे; गणेश पाटील ३९वे; भूषण ढेरे ४१वे; श्रेयस डी ५१वे; विशाल पिल्ले ५३वे) वि.वि.राज्य राखीव पोलीस दल (एस आर पी एफ) ०
पीसीएमसी: ८(अभिषेक माने २ रे; हर्षदीप सिंग १३वे ५१वे; सौरभ पाटील ३७ वे ; अक्षय जाधव ३९ वे; जय काळे ५५वे, ५७वे; विक्रम पिल्ले ५९वे) वि.वि हॉकी लव्हर्स क्लब १(निहाल गोरटकर१९वे)-
जीएसटी सीमाशुल्क पुणे: ६ (स्टीफन स्वामी २४वे; बी.फेलिक्स ३९ वे ; तालेब शाह, फेलिक्स बा, सतीश पॉल, स्टीफन स्वामी) वि.वि इन्कम टॅक्स पुणे: ४ (विक्रम सिंग १६ वे, ५३ वे; गुरुमुख सिंग, चिराग माने)
उपांत्य फेरीचे सामने-
पीसीएमसी विरुद्ध जीएसटी
मध्य रेल्वे विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी
महत्वाच्या बातम्या –
WFI President: बृजभूषण सिंग यांचा दबदबा कायम! पाहा कोण बनलंय नवा अध्यक्ष
‘प्लीज RCB जॉईन करा आणि एक ट्रॉफी जिंकून द्या…’, चाहत्याच्या प्रश्नावर Dhoni म्हणाला, ‘माझ्याच संघात…’