इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. खेळाडूंचे फोटोशुटही झाले आहे. असे असतानाच चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीने त्याच्या जर्सीवरील दारुच्या कंपनीचा लोगो काढून टाकण्याची मागणी केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, आता चेन्नईचे सीइओ यांनीच या वृत्ताचे खंडन केले आहे.
माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की सीएसके संघाने आपली नवीन जर्सी लाँच केली होती, ज्यामध्ये एसएनजी १०००० या मद्य उत्पादन कंपनीचा देखील लोगो होता. त्यामुळे मोईन अलीने हा लोगो जर्सीवर परिधान करण्यास नकार दिला होता. मोईन अली हा इस्लाम धर्माचे पालन करतो, त्यामुळे तो मद्यपान करत नसल्याने त्याची जाहीरात करण्यास नकार दिला.
पण आता चेन्नई सुपर किंग्सचे सीइओ कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की मोईन अलीने जर्सीवरील लोगो हटवला जावा, अशी कोणतीही मागणी केली नव्हती. त्यांनी म्हटले आहे की ‘मोईन अलीकडून सीएसकेला कोणताही लोगो हटवण्यात यावा, याबद्दल मागणी करण्यात आली नव्हती.’
एसएनजी १०००० ही चेन्नईतील मद्य उत्पादन कंपनी चेन्नई सुपर किंग्सच्या प्रायोजक कंपनींपैकी एक आहे.
क्रिकेट खेळताना जर्सीवर दारुच्या कंपनीचा लोगो लावण्यास यापूर्वी दक्षिण आफ्रिकन संघाचा माजी फलंदाज हाशिम आमला याने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. त्यामुळे त्याला काहीप्रमाणात आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले आहे.
मोईन अली पहिल्यांदाच खेळणार चेन्नईकडून
आयपीएल २०२१ च्या लिलावात मोईन अलीला चेन्नई संघाने ७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. मोईन अली मागीलवर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत होता. पण त्याला बेंगलोरने लिलावाआधी संघातून मुक्त केले होते. त्यानंतर चेन्नईने त्याला लिलावात खरेदी केले.
त्याने आतापर्यंत आयपीएलचे १९ सामने खेळले आहेत. यात त्याने २०.६ च्या सरासरीने ३०९ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने १० गडी देखील बाद केले आहेत
सीएसकेची आयपीएल २०२१ साठी नवी जर्सी
काही दिवसांपूर्वीच चेन्नईने आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. चेन्नई सुपर किंग्सची नवी जर्सी नेहमीप्रमाणे पिवळ्या रंगाचीच आहे. तसेच जर्सीच्या खालच्या बाजूला गर्जना करणारा सिंह देखील आहे. पण याबरोबरच जर्सीच्या खांद्यावर केमोफ्लाजचे डिझाईन आहे. तसेच जर्सीच्या पुढच्या बाजूला ‘मिंत्रा (Myntra)’ चा लोगो दिसणार आहे. कारण चेन्नईचे प्रायोजकत्व यंदा मिंत्राकडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन; महान क्रिकेटपटू सीके नायडूंशी होते ‘हे’ नाते
शार्दुल, नटराजन पाठोपाठ सिराजलाही आनंद महिंद्रा यांच खास गिफ्ट; घरी झालं महागड्या कारचं आगमन






