कोणत्याही क्रिकेटपटूला त्याचे संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या प्रदर्शनात सातत्य राखावे लागते. एखाद्या सामन्यात जरी क्रिकेटपटूच्या प्रदर्शनात बिघाड झाले; तरीही त्याला पुढील काही सामन्यात बाकावर बसवल्याचे किंवा संघातून वगळल्याचे आपण पाहिले आहे. असेच काहीसे झाले आहे, इंग्लंडचा ३३ वर्षीय अष्टपैलू मोईन अली याच्यासोबत.
आयपीएल २०२१ लिलावापुर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने खराब कामगिरीमुळे त्याला डच्चू दिला. त्यानंतर तब्बल ७ कोटींची किंमत मोजत एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने त्याची निवड केली. आता हाच अष्टपैलू धोनीच्या नेतृत्त्वाखाली आयपीएलचे मैदान गाजवताना दिसत आहे.
मोईन अली मागील २ हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. २०१८ ते २०२० या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून त्याने १९ सामने खेळले होते. दरम्यान ३ अर्धशतकांसह त्याने ३०९ धावा केल्या होत्या. त्यातही संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएल २०२० मध्ये त्याची कामगिरी फारच निराशादायी राहिली होती. त्यामुळे विराटने त्याला पूर्ण हंगामात अवघ्या ३ सामन्यात खेळण्याची संधी दिली होती. यावेळी त्याने १२ धावा आणि एका विकेटची कामगिरी केली होती.
मोईन अलीची ही नकोशी आकडेवारी पाहता विराटने आयपीएल २०२१ लिलावाआधी त्याला रिलीज केले होते. त्यानंतर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात सहभागी झाल्यावर मोईन अलीला सूर गवसला. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून आतापर्यंत अवघे ५ सामने खेळताना त्याने १४८ धावा चोपल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १५५.७८ इतका राहिला आहे. तसेच ४६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. याबरोबरच ७ धावा देत ३ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीसह त्याने एकूण ४ विकेट्सही चटकावल्या आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज (१ मे) हंगामातील २७ वा सामना रंगणार आहे. या सामन्यातही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाल्यास मोईन अली त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाने धुमाकूळ घालू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने सोडलं, रोहितने घेतलं; आज चेन्नई सुपर किंग्जचं कंबरड मोडणार ‘हा’ अनुभवी धुरंधर!
विजयाच्या गोडव्यात पंजाब किंग्जसाठी कडवी बातमी, पडीक्कलला बोल्ड करणारा ‘हा’ गोलंदाज दुखापतग्रस्त
चेन्नई विरूद्ध मुंबई सामन्यात कोण गाजवणार वर्चस्व? इतिहास आहे ‘या’ संघाच्या बाजूने