पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात शाहीनची कामगिरी खराब राहिली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आलं. पहिल्या कसोटीत त्यानं फक्त 2 विकेट घेतल्या होत्या. शाहीनच्या खराब कामगिरीमागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक कारण त्याचा सहकारी गोलंदाज मोहम्मद आमिर यानं 2 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं.
सध्या मोहम्मद आमिरच्या जवळपास दोन वर्ष जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आमिर म्हणाला होता की, तुम्ही शाहीनला पाहा. तो सतत खेळत आहे. भविष्यात याचा खूप फरक पडेल. आमिरचं हे वक्तव्य आता खरे ठरताना दिसत आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये क्रिकेट पाकिस्तानशी संवाद साधताना आमिर म्हणाला होता, “जर तुम्ही पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क किंवा हेझलवूडकडे बघितलं, तर ते कधीही मालिकेत तिन्ही फॉरमॅटचे पूर्ण सामने खेळत नाहीत. जर ते कसोटी खेळले तर कदाचित पहिले 2 एकदिवसीय सामने खेळणार नाहीत. जर ते एकदिवसीय मालिका खेळले, तर टी20 खेळणार नाहीत. ते आपल्या खेळाडूंना अशा प्रकारे मॅनेज करतात.”
आमिर पुढे म्हणाला, “शाहीनकडे बघा. तो खेळतच राहतो. तो सध्या तरुण आहे. 23-24 वर्षांचा आहे. पण एक वेळ अशी येईल, जेव्हा तो 26 वर्षांचा होईल आणि तिन्ही फॉरमॅट खेळेल, तेव्हा तुम्ही मला विचाराल, तू म्हणत होतास ते खरं होतं.”
विशेष म्हणजे, शाहीन आफ्रिदीची कामगिरी गेल्या काही काळापासून घसरत चालली आहे. त्याच्या गोलंदाजीत पूर्वीप्रमाणे धार राहिलेली नाही. शाहिननं आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 30 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणापासूनच तो जवळपास तिन्ही फॉरमॅट खेळत आहे.
हेही वाचा –
घातक बाऊन्सर थेट मानेवरच आदळला, फलंदाजानं लगेच सोडलं मैदान; पाहा नक्की काय घडलं
दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतर शाहीन आफ्रिदी शॉकमध्ये, पाकिस्तान संघात उभी फूट
भारतीय संघाला मोठा धक्का! बुची बाबू स्पर्धेत वर्ल्ड कप हिरो दुखापतग्रस्त