आजपर्यंत क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले. परंतु त्यांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यापूर्वी अतिशय मेहनत करावी लागली तसेच वाटही पहावी लागली. भारतीय क्रिकेट इतिहासातही असा एक खेळाडू आहे, ज्याला ‘मनगटाचा जादूगार’ देखील म्हटले जाते. ते खेळाडू म्हणजे भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन. अझरूद्दीन हे त्या खेळाडूंपैकी एक होते, ज्यांनी आपल्या पदार्पणापूर्वी मैदानात खेळाडूंना केवळ पाणी पाजण्याचे काम केले. परंतु त्यांनी जेव्हा पदार्पण केले, तेव्हा त्यांनी जगभरातील गोलंदाजांना पाणी पाजायला सुरुवात केली.
सामन्याच्या ४५ मिनिटांआधी केले संघात सामील
एका मुलाखतीदरम्यान अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी नुकतेच आपल्या पदार्पण कसोटी सामन्याची आठवण सांगितली. त्याचबरोबर पदार्पणानंतर ठोकलेल्या ३ शतकांबद्दलही चर्चा केली. यादरम्यान त्यांनी सांगितले की सामन्यापूर्वी त्यांना अंतिम अकरामध्ये कशाप्रकारे सामील केले होते.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटले, “मला सामना सुरू होण्याच्या केवळ ४५ मिनिटांपूर्वी मी संघात खेळणार असल्याचे समजले. मी खूप घाबरलो होतो. तरीही, मला विश्वास होता, की मागील ३-४ महिन्यांपासून माझी देशांतर्गत सामन्यांमधील कामगिरी चांगली राहिली आहे. मी रणजी ट्रॉफी सामन्याच्या दोन्हीही डावात शतक केल्यानंतर इथे पोहोचलो आहे. मला आत्मविश्वास होता. परंतु मला वाटते की निवडकर्त्यांनाही माझ्यावर विश्वास होता. तत्कालीन मुख्य निवडकर्ता चंदू बोर्डे सरांनी म्हटले की मी खेळले पाहिजे.”
२ कसोटी सामन्यांसाठी होते १२ वे खेळाडू
अझरूद्दीन यांनी पुढे सांगितले, की त्यावेळी खराब फॉर्ममुळे कपिल देव (Kapil Dev) यांना संघातून वगळण्यात आले होते. त्यापूर्वी खेळण्यात आलेल्या २ कसोटी सामन्यात मी १२ वा खेळाडू म्हणून संघात सामील झालो होतो.
ते म्हणाले, “मी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी संघातील १२ वा खेळाडू होतो. त्यामुळे मी कसोटी क्रिकेट कसे खेळले जाते आणि मानसिकरीत्या तयारी कशी केली जाते हे समजून घेत होतो. मी हे पाहून खूप काही शिकलो. मला सनी भाई (सुनील गावसकर) सोबत खेळायला मिळाल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजत होतो. त्या संघात अनेक दिग्गज खेळाडू होते. जसे की, दिलीप भाई (वेंगसरकर), जिम्मी भाई (मोहिंदर अमरनाथ), किरी भाई (सय्यद किरमानी). कपिल पाजी त्या सामन्यात नव्हते. परंतु माझ्याजवळ बरेच खेळाडू होते, जे मला सल्ला देऊ शकत होते.”
खराब प्रकाशझोतात ठोकले पहिले शतक
“मी पहिल्यांदा इतक्या लोकांसमोर खेळत होतो. चेंडू चारही दिशांना स्विंग होत होता. डिसेंबरच्या शेवटी कोलकातामध्ये खूप थंडी असते शिवाय अंधारही होता. त्यावेळी सूर्यप्रकाशही फार कमी होतो. मी भाग्यवान होतो, की ३२२ चेंडू खेळलो आणि १० चौकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. येथील परिस्थिती मोठे फटके मारण्यासाठी अनुकूल नव्हती. मला नियंत्रण ठेवायचे होते, आणि मी ते ठेवलेही. दिवसाच्या अखेरपर्यंत मी एक शतकही साजरे केले. हे खूप समाधानकारक होते. हे माझे नशीबच होते की मी माझ्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकले होते,” असे त्या सामन्याचा उल्लेख करत अझरूद्दीन म्हणाले.
अझरूद्दीन यांनी या मालिकेत चेन्नई येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात १०५ धावांची, तर कानपूर येथील कसोटी सामान्यातील पहिल्या डावात १२२ धावांची खेळी केली होती. इडन गार्डन्सबद्दल बोलायचं झालंं, तर तिथे त्यांनी आपल्या कारकिर्दीत ७ कसोटी सामन्यांमध्ये १०७. ५० च्या सरासरीने ८६० धावा केल्या. त्यामध्ये ५ शतकांचा समावेश आहे.
अझरूद्दीन यांनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकूण ९९ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ४५.०३ च्या सरासरीने ६२१५ धावा केल्या. त्यामध्ये २२ शतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताला विश्वचषक जिंकून देणारा असा खेळाडू, ज्याला कधीच मिळाले नाही कामगिरीचे श्रेय
-ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पहा कसा असेल हा दौरा
-गोष्ट कशाचीही फिकीर न करता मनमर्जी करणाऱ्या एका क्रिकेट प्रशासकाची





